
देहू, ता. १ : देहू नगरपंचायतीचा प्रारूप विकास आराखडा पुढील एक वर्षात करण्यात येणार आहे. या विकास आराखड्यासंदर्भात पुणे येथील नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक व इतर पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. ३१) देहू नगरपंचायतीमध्ये नगरपंचायत प्रशासनाबरोबर बैठक घेऊन विविध विषयावर चर्चा केली.
नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक अभिजित केतकर ,नगर रचनाकार अधिकारी मंगेश देशपांडे, देहू नगरपंचायतचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, प्रतीक भामे, सुरेंद्र आंधळे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त उमेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे,नगरपंचायतीचे सदस्य व इतर उपस्थित होते. या बाबत मुख्याधिकारी चेतन कोंडे म्हणाले, ‘‘देहूमध्ये डीपी प्लॅन तयार करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पुणे नगर विकास विभागाचे अधिकारी यांनी चर्चा केली. या चर्चेमध्ये तीर्थक्षेत्र कॉरिडॉर, देहूमधील वाहन वाहनतळ, आठवडे बाजारासाठी जागा, शाळा, दवाखाने, अंतर्गत रस्ते, विविध ठिकाणी उद्याने उभारण्यासंदर्भात चर्चा झाली. संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पालखीतळ, भक्तनिवास सुचविण्यात आले आहे. परंडवाल चौकामधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, नवीन एसटीपी प्लांट उभारणे यासाठी मागणी करण्यात आली आहे. अनेक विकासकामांना आराखड्यात नगरविकास विभागाला सुचविण्यात आलेले आहेत. यातील काही विकासकामे किंवा विकास आराखडा सरकारी गायरानामध्ये होईल. तर काही कामे जागेचे भूसंपादन करून करण्यात येतील. त्यासाठी बाजारभावाच्या तीन पट दराने मोबदला देणे अथवा टीडीआर देणे संदर्भात चर्चा झाली. प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर नागरिकांच्या हरकती सूचना घेण्यात येतील. प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी शासनाच्या वतीने खर्च करण्यात येणार आहे. साधारणपणे याला एक वर्षाचा कालावधी लागेल. त्यानंतर नागरिकांच्या हरकती सूचना मागविण्यात येतील.