देहू नगरपंचायत सर्वसाधारण सभेत विविध विकासकामांना मंजुरी
देहू, ता. १७ : देहू नगरपंचायतीच्या मंगळवारी (ता.१६) झालेल्या सर्वसाधारण सभेत ४८ पैकी ४७ विषयांना मंजुरी देण्यात आली. यात बोडकेवाडी जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्ती आणि देहू नगरपंचायत हद्दीतील बोडकेवाडी, माळीनगर आणि विठ्ठलवाडी या गावातील गावठाण क्षेत्रात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली.
नगराध्यक्ष पूजा दिवटे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. नगरपंचायत सदस्य योगेश परंडवाल, प्रवीण काळोखे, सुधीर काळोखे, योगेश काळोखे ,आदित्य टिळेकर, मयूर शिवशरण, नगरपंचायत सदस्य रसिका काळोखे, पुनम काळोखे, सपना मोरे, स्मिता चव्हाण, पूजा काळोखे, ज्योती टिळेकर, मुख्याधिकारी चेतन कोंडे, कार्यालयीन अधीक्षक प्रिया कदम तसेच विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सभेत विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. कार्यालयातील विविध विभागातील मुदत संपलेल्या कामांसाठी नवीन निविदा प्रक्रिया होईपर्यंत संबंधित कामांना, पाणीपुरवठा विभागात पाइपलाइन देखभाल दुरुस्तीच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली. वॉर्ड क्रमांक ९ मध्ये मित्रांगण सोसायटीत नवीन पिण्याची पाइपलाइन आणि चव्हाण नगर मधील भाग दोन येथील कौस्तुभ सोसायटी येथे पाण्याची पाइपलाइन टाकण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती प्रिया कदम यांनी दिली.
तसेच विकास आराखड्यात बांधण्यात आलेल्या भक्त निवासाची व्यवस्था संत तुकाराम महाराज संस्थान यांच्याकडे आहे. मात्र हे भक्त निवास देहू नगरपंचायत ने ताब्यात घ्यावे, असा आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून नगरपंचायत प्रशासनास प्राप्त झालेला आहे. हे निवासस्थान नगरपंचायतीकडे वर्ग करण्याअगोदर संस्थान बरोबर चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचा विषय मंजूर करण्यात आला.

