
इंदोरी वनक्षेत्र विभागात अतिक्रमणांमध्ये वाढ
इंदोरी, ता. १६ ः इंदोरी व जांबवडे हद्दीतील वनक्षेत्र विभागात अतिक्रमणांमध्ये वाढ होत आहे. याला वनपरिक्षेत्र विभागाचे धोरण जबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ बी. एम. भसे यांनी दिली. भंडारा डोंगर पायथ्याचे वनक्षेत्राचे राखीव मोकळ्या जागेत अनेकांनी व्यावसायिक जाहिराती लावल्या असल्याची बाब निदर्शनास आल्यावर वनक्षेत्र
विभागाने संबंधित जाहिरातदारांना तातडीने नोटिसा बजावल्या. नोटिसांचा आदर करीत काही संबंधितांनी जाहिराती फलक तातडीने काढले. परंतु ७-८ महिने होऊनही काहींनी वनक्षेत्र हद्दीतील जाहिरात फलक हटवले नाहीत. उलट जाहिरात फलकांची संख्या वाढली आहे. शिवाय फलकांवर विजेची सोय करण्यात आलेली
आहे. याकडे वनक्षेत्र विभाग दुर्लक्ष करीत असल्याची बाब भसे यांनी दिली. इंदोरी व जांबवडे वनक्षेत्र विभाग हद्दीतील अतिक्रमणे, लाकूड फाटा चोऱ्या, बेकायदा चरणारी जनावरे, शेळ्या- मेंढ्या याबाबत वनक्षेत्रपाल यांनी दखल घ्यावी. अन्यथा वडगाव मावळ वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कारभाराची तक्रार जिल्हा व राज्य वनक्षेत्र विभाग
तसेच वनमंत्रालयाकडे करावी लागेल. प्रसंगी उपोषण आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा बी. एम. भसे यांनी दिला आहे.
याबाबत वनपाल डी. एम. ढेंबरे म्हणाले, ‘‘संबंधितांना पुन्हा नोटिसा देऊन कायदेशीर दंडात्मक कारवाई करून अतिक्रमणे वनक्षेत्र विभागच हटवेल.’’
-----------------------------------