इंदोरीत पारंपरिक पद्धतीने दसरा उत्साहात
इंदोरी, ता. ३ : विविध धार्मिक कार्यक्रमांसह इंदोरी ग्रामस्थांनी दसरा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला.
ग्रामदैवत कडजाई माता मंदिरात संदीप काशिद-पाटील आणि त्यांच्या परिवाराच्या हस्ते पहाटे देवीचा अभिषेक करण्यात आला. तर सायंकाळी सीमोल्लंघन करून दहा दिवसांच्या नवरात्रोत्सव आणि दसरा सणाची सांगता झाली. याचवेळी भटकंती ‘सह्याद्री सामाजिक प्रतिष्ठान’च्या वतीने सुरू असलेल्या श्री दुर्गामाता दौड उपक्रमाचा समारोप झाला. तसेच, रा.स्व. संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन आणि शस्त्रपूजनही पार पडले. सायंकाळी विठ्ठल शिंदे, प्रशांत ढोरे, दिलीप ढोरे, संदीप काशिद आणि अंकुश ढोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयापासून ग्रामस्थ मिरवणुकीने सीमोल्लंघनासाठी पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघाले. सरस्वती विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणात मिरवणुकीत आणलेल्या शमी (आपटा) वृक्ष फांदीचे पूजन पोलिस पाटील जयदत्त शिंदे, माजी सरपंच दामोदर शिंदे, संदीप ढोरे, सुदाम शेवकर आणि दीपक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. पूजनानंतर शमी फांदीची सोने (पाने) ग्रामस्थांनी लुटली. सीमोल्लंघन मिरवणुकीत बबनराव ढोरे, साईनाथ बाणेकर, जयंत राऊत, निवृत्ती ढोरे, दादा काशिद, हरीभाऊ पवार, नितीन ढोरे, आशिष ढोरे, विष्णू शिंदे, नारायण शिंदे, विजय शिंदे आणि विजय चव्हाण यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मनोहर भेगडे यांनी आभार मानले.
---