

इंदोरी, ता. १५ ः यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून पाऊस सुरू झाल्याने खरीप व रब्बी हंगामातील शेती मशागती व पेरणी कामे वेळेत होऊ शकली नाहीत. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंतु मागील पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने इंदोरी परिसरात शेतीकामास वेग आला आहे.
अनेकांची रखडलेली सोयाबीन काढणी सुरु आहे. सांगुर्डी, इंदोरी, कान्हेवाडी, कोटेश्वरवाडी, येलवाडी येथे पुखराज बटाटा लागवड सुरु आहे. बटाटा बियाणे महाग असल्याने बटाटा लागवड ही कमीच होणार, असे भागूजी दाभाडे, सुदाम भसे, संजय भेगडे यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे कांद्याच्या रोपांचे नुकसान झाल्याने कांदा लागवड ही कमीच होणार. नंतर लावलेल्या रोपांच्या लागवडीस १५ ते ३० दिवसाचा अवधी आहे, असे सपना चव्हाण, आबासाहेब हिंगे, आबासाहेब काशीद या शेतकऱ्यांनी सांगितले. भात काढणीस वेग आला असून मजूर टंचाईमुळे यांत्रिक वापर वाढला आहे. भात काढणीनंतर बागायती ज्वारी, गहू, हरभरा पेरणी सुरु होईल. ज्वारी बियाणे फुले रेवती, परभणी मोती व सुवर्णा वाणास पसंती तर अजित १०८, १०९, नोव्हेल ५१०, महिको ७०७० व अंकुर केदार या गहू वाणास अधिक पसंती आहे. कोरडवाहू क्षेत्रातील पेरणी पूर्ण झाली आहे. अशी प्रतिक्रिया दिनेश चव्हाण व शंकर उबाळे यांनी व्यक्त केली. खते, औषधे, बियाणे याबाबत अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. म्हणून अधिकृत विक्रेते व शासकीय पोर्टल वरून खरेदी करावी, असे आवाहन इंद्रायणी कृषी सेवा केंद्राचे संचालक गणेश दाभाडे यांनी केले आहे.