जाधववाडीत नागरी सुविधांची वानवा
जाधववाडी, ता. १७ ः जाधववाडी परिसरात मूलभूत नागरी सुविधांचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त झाले असून, रोजच्या जीवनावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. शहर वेगाने विकसित होत असतानाच जाधववाडी, कुदळवाडी परिसर मात्र अद्यापही दुर्लक्षित राहिल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मोई ते पिंपरी, मोई ते जाधववाडी मुख्य रस्ता तसेच मधला पेठा, आहेरवाडी चौक अशा अनेक उपरस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत. दुचाकीस्वारांचे अपघात होण्याचे प्रकार वाढत असून, अनेक ठिकाणचे पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असल्याने अपघाताचा धोका दुपटीने वाढत आहे. अंधारामुळे महिलांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जाधववाडीत ड्रेनेजची समस्या सर्वात गंभीर आहे. चेंबर वारंवार तुंबणे, रस्त्यावर पाणी साचणे आणि दूषित पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने नागरिक त्रस्त होतात. यामुळे आजारांचे प्रमाणही वाढल्याचे रहिवासी सांगतात.
पाणीपुरवठ्याची अनियमितता ही देखील मोठी समस्या आहे. काही भागात पाणी कमी दाबाने येते, तर काही ठिकाणी दिवसा आडच पाणी मिळते. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पाणी टंचाईबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. कचरा व्यवस्थापनाची परिस्थितीही चिंताजनक आहे. नियमितपणे कचरा न उचलल्यामुळे वडाचा मळा आणि सावतामाळी मंदिराजवळील रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. यामुळे डास, माशा आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढून परिसर अस्वच्छ झाला आहे. नागरिकांनी स्वच्छता विभागाच्या निष्क्रीयतेवर नाराजी व्यक्त केली आहे.
जाधववाडीमध्ये सार्वजनिक उद्यान असून त्यातही अनेक सुविधांचा अभाव दिसून येतो. त्यात असलेले स्वच्छतागृह दयनीय अवस्थेत आहे.
तसेच खुली मैदाने आणि विरंगुळ्याची साधने यांचा अभाव जाणवतो. गेल्या अनेक वर्षांपासून या समस्या असून विकास कामे कुठे होत आहेत हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
नवीन रस्ते नाहीत आणि आहेत त्यात खड्डे पडले आहेत त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. स्थानिक रहिवाशांनी वारंवार महापालिका, संबंधित विभागाकडे मागण्यांचे निवेदन दिले असले तरी प्रत्यक्षात कामांची गती संथ आहे. प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्ती, पथदिवे सुरू करणे, ड्रेनेज साफसफाई, नियमित कचरा उचल, तसेच पाणीपुरवठ्याचे नियोजन यावर काम सुरू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
मी या ठिकाणी सात वर्षांपासून राहत आहे. या ठिकाणी शहरात राहतो असे वाटत नाही. आपण गावठाणात राहतोय असे वाटते. सगळीकडे धूळ माती, खड्डे, अपूर्ण रस्ते अशा अनेक समस्या आहेत.
-सुनील गायकवाड, स्थानिक रहिवासी
मोकाट कुत्र्यां संबंधित आम्ही लवकरच निर्बीजीकरण मोहीम राबवून उपाययोजना करणार आहोत.
-अरुण दगडे, पशू वैद्यकीय अधिकारी, महापालिका
गटार आणि चेंबर तुंबल्याच्या तक्रारी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना सांगून उपाययोजना करण्यात येईल.
-बगली सदाशिव, अभियंता, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

