देहूरोड कॅन्टोन्मेंट कार्यालयात विजेचा अपव्यय

देहूरोड कॅन्टोन्मेंट कार्यालयात विजेचा अपव्यय

देहूरोड, ता.११ : देहूरोड कॅन्टोन्मेंट कार्यालयात अधिकारी जागेवर नसतानाही विजेचे दिवे आणि पंखे सुरूच असतात. त्यामुळे, विजेचा अपव्यय होत आहे. याशिवाय कामासाठी कार्यालयात गेल्यावर बसण्यासाठी खुर्च्या सुद्धा उपलब्ध केल्या जात नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड सध्या बरखास्त असल्याने नगरसेवकांविना कॅन्टोन्मेंट अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व नामनिर्देशित सदस्य यांच्या द्वारा कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासन चालविले जात आहे.
कॅन्टोन्मेंट प्रवेशद्वारावर उजव्या बाजूस आरोग्य विभाग व आवक-जावक विभाग आहे. मुख्य इमारतीत मिळकत कर विभाग, भांडार विभाग, कार्यालयीन अधीक्षक विभाग, स्थापत्य, शिक्षण, पाणीपुरवठा आदी वेगवेगळे विभाग आहेत. गेल्या काही महिन्यांपासून संबंधित विभागांत कर्मचारी, अधिकारी त्यांच्या दालनात उपलब्ध नसतानाही विजेचे दिवे आणि पंखे हे अधिक वेळ सुरूच असतात. त्यामुळे, विजेचा अपव्यय होऊन त्याचे प्रशासनास जादाचे बिल येत आहे. हे नागरिकांच्या कररूपी पैशांचे नुकसान आहे. ते थांबवावे, अशी मागणी सजग नागरिकांनी केली आहे.
बसण्याची व्यवस्थाच नाही
कॅन्टोन्मेंटच्या मिळकतकर विभागासह आणि अन्य विभागांत बहुतेक ठिकाणी कामे घेऊन येणाऱ्या संबंधित नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांअभावी ताटकळत उभे राहूनच कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांशी संवाद साधावा लागतो. सरकारी कार्यालयात ही बाब भूषणावह नाही याकडे नागरिकांनी लक्ष वेधले. दरम्यान याबाबत कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मात्र, त्या उपलब्ध न झाल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

आपण घरी विनाकारण वीजेचे दिवे आणि पंखे सुरू असल्यास ते बंद करण्याची खबरदारी घेतो. अगदी त्याचप्रमाणे कॅन्टोन्मेंट कार्यालय आपले घरच आहे, असे समजून अधिकारी, कर्मचारी यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी.
- हाजीमलंग मारीमुत्तु, माजी सदस्य, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com