किवळे परिसरातील प्रमुख रस्त्यांची चाळण
किवळे, ता.१ : किवळे परिसरातील प्रमुख रस्त्यांची पावसामुळे पुन्हा दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
मुकाई चौक ते मुकाई देवी मंदिरापर्यंतचा रस्ता हा खड्ड्यांनी व्यापला असून ये-जा करणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना त्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.
याचबरोबर, मुकाई चौक निगडी बीआरटी मार्गाशी जोडणारा श्रीनगर - के. व्हिले रस्ता देखील अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. जुनवणे वीटभट्टीजवळ महापालिकेच्या वाहिनी खोदाईनंतर रस्त्याची अद्याप दुरुस्ती न झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुरुस्तीच्या अभावी या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांची रोजची गैरसोय सुरूच आहे.
रस्त्यांची ही बिकट परिस्थिती लक्षात घेता महापालिका प्रशासनाने त्वरित रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक मुकेश शहा आणि बाळासाहेब गायकवाड यांनी केली आहे. रावेतच्या लक्ष्मीनगर परिसरातील अंतर्गत रस्त्याचीही वाईट अवस्था झाली आहे. रहिवाशांना खड्डेमय डबक्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दौलत भोंडवे, अस्मिता सोनवणे, शीतल सोनवणे यांनी सांगितले.
KIW25B05022