भरधाव अवजड वाहनांकडून ‘धूळफेक’

भरधाव अवजड वाहनांकडून ‘धूळफेक’

Published on

देहूरोड, ता.१२ : महामार्गांवरून क्रशसॅन्ड वाहतूक करणाऱ्या अवजड वाहने (हायवा) भरधाव वेगाने धावत असून त्यामधून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. डोळ्यांत धूळ जाणे, श्वसनाचा त्रास आणि दृष्टी अस्पष्ट होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. शिवाय अपघातांचाही धोका वाढला आहे. तरीही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मावळ, मुळशी, खेड, हवेली आणि भोर तालुक्यांतील गावांमधून ही अवजड वाहने प्रामुख्याने येत असतात. चालक भरधाव गतीने वाहने चालवत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. अलीकडेच कात्रज - देहूरोड बाह्यवळण मार्गावर किवळे आणि हिंजवडी परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा बळी गेला आहे. तरी देखील या अवजड वाहनांचा वेग कमी झालेला नाही, अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणाऱ्या जड वाहनांवर महसूल विभाग वेळोवेळी दंडात्मक कारवाई करतो. मात्र, त्याचे धुळीच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे. या वाहनांमधून उडणारी धूळ थेट नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. याबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

सुरक्षित प्रवासासाठी वाहन चालवताना चालकांचे वेगावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. गतिरोधक आल्यावर अशा वाहन चालकांनी गती कमी करावी. नियमाचे उल्लंघन होत असेल; तर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, एकंदरीत ही समस्या सर्वत्र आहे. त्यामुळे शासन स्तरावरच याबाबत ठोस उपाययोजना व्हावी.
- दीपाली पिंजण-काळोखे पाटील, नागरिक


तहसिलदारांच्या उपस्थितीत खाण मालकांची बैठक होत असते. त्यात सर्व सर्कल अधिकारी सहभागी होतात. क्रश सॅन्ड वाहतुकीदरम्यान प्रत्येक अवजड वाहनांतील वाळूवर पाणी मारणे किंवा माल झाकून नेणे याबाबत कडक सूचना दिल्या जातील.
- लिंबराज सलगर, मंडल अधिकारी

Marathi News Esakal
www.esakal.com