देहू-देहूरोड मार्गाच्या दुरवस्थेने गैरसोय, वैताग

देहू-देहूरोड मार्गाच्या दुरवस्थेने गैरसोय, वैताग

Published on

देहूरोड, ता. १० : देहू ते देहूरोड या प्रमुख मार्गाची गेल्या काही महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे, धूळ व वाहतुकीतील अडथळ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीचे कामे सुरू होणार असल्याची आश्वासने कॅन्टोन्मेंट अभियांत्रिकी विभागाकडून दिली जात असली, तरी प्रत्यक्षात सुधारणा दिसत नसल्याने प्रशासकीय कारभाराला नागरिक वैतागले आहेत.
देहू ते देहूरोड या सुमारे साडेतीन किलोमीटरच्या मार्गावरून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. तसेच देहू येथे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचीही रहदारी या मार्गावरून होते. परंतु, भाविकांना खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पर्यटक व भाविकांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. हा रस्ता पावसाळ्यात पूर्णपणे उखडला आहे. कॅन्टोन्मेंट प्रशासन खड्डे बुजविण्याचे काम केवळ तात्पुरते करत असल्याने काही दिवसांतच स्थिती पूर्ववत होते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे.
व्यापारी आणि वाहतूकदारांनीही या समस्येवर आवाज उठवत कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे वारंवार निवेदने दिली असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. अभियांत्रिकी विभागाकडून अद्याप रस्ता दुरुस्तीचा ठोस आराखडा किंवा कामाची तारीख जाहीर करण्यात आली नाही. स्थानिक आमदार निधीतून विकासकामांवर मोठा निधी खर्च झाला. परंतु महत्त्वाच्या मार्गांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.


देहू-देहूरोड हा वाहतुकीचा मुख्य व अतिशय संवेदनशील मार्ग आहे. तरीही या रस्त्याकडे प्रशासनाने कायमच दुर्लक्ष केले आहे. खड्डे आणि सतत कोंडी यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर आहे. प्रशासनाने तत्काळ रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.
- ॲड. सुरेश खुर्पे, सामाजिक कार्यकर्ते

देहूत दर्शनासाठी येणाऱ्या राज्यभरातील भाविकांची या रस्त्यामुळे गैरसोय होत आहे. अपघाताचा धोका कायम भेडसावत आहे. कॅन्टोन्मेंट विभागाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम सुरू करणे आवश्यक आहे.
- कृष्णा परंडवाल, स्थानिक नागरिक

देहू ते देहूरोड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पुढील आठवड्यात सुरू करणार आहोत. नागरिक व भाविकांना होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन तातडीने कामाची प्रक्रिया सुरू केली आहे.
- टोनी ॲंथोनी, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य विभाग, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड

पालखी मार्ग असल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आम्ही पालिकेला पत्रव्यवहार केला होता. मात्र, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हद्दीत असल्याचे सांगितले जाते. या टोलवाटोलवीमुळे पालखी मार्गस्थ होताना गैरसोय होत आहे. सध्या रस्त्याच्या परिस्थितीमुळे पंचक्रोशीतील नागरिकांच्या त्रास वाढला आहे.
- सुहास गोलांडे, माजी सदस्य, हवेली पंचायत समिती

KIW25B05235

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com