वाढत्या नागरीकरणाबरोबरीने कांदा, खोडवा ऊसही जोमात
किवळे, ता.२८ : रावेत परिसरात वाढत्या नागरीकरणाबरोबरच सध्या कांद्याचे पीक आणि खोडवा ऊस जोमात असून थंडीमुळे तयार झालेल्या पोषक वातावरणाचा या पिकांना मोठा फायदा होत असल्याचे चित्र आहे. हवामानातील गारवा, जमिनीतील ओलावा आणि पवना नदीच्या पाण्यामुळे कांदा व ऊस पिकांची वाढ समाधानकारक झाली आहे.
साधारणतः तीस वर्षांपूर्वी रावेत परिसर पूर्णपणे शेतीप्रधान होता. गावाला पवना नदीचे वरदान लाभल्यामुळे येथे बागायती शेती मोठ्या प्रमाणावर केली जात होती. भाजीपाला उत्पादनासाठी रावेतची ओळख होती. येथील भाजीपाला देहूरोड येथील महात्मा फुले मंडई आणि चिंचवडगावातील मंडईत विक्रीसाठी पाठवला जात असे.
बागायती पिकांसोबतच कोरडवाहू शेतीही मोठ्या प्रमाणावर होत होती. विशेषतः ज्वारी आणि भुईमूग या पिकांचे क्षेत्र अधिक होते. मात्र, महापालिकेत समावेशानंतर बांधावरून प्रशस्त रस्ते तयार झाले. त्यामुळे जमिनींच्या किमती प्रचंड वाढल्या आणि काबाडकष्टाची शेती मागे पडत गेली.
गेल्या सुमारे पंचवीस वर्षांत महापालिकेत समावेश झाल्यानंतर रावेत परिसरात बांधकाम क्षेत्राचा झपाट्याने विस्तार झाला आहे. वाढते शहरीकरण, डीपी रस्त्यांचे जाळे आणि जागांना मिळालेला सोन्याचा भाव यामुळे शेती करणे अनेक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडेनासे झाले आहे. परिणामी, शेतीऐवजी स्वतः विकसित करणे किंवा बांधकाम व्यावसायिकांना जमिनी विकासासाठी देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतो.
तरीही, रावेतमध्ये आजही काही शेतकरी शेतीला प्राधान्य देत आहेत. शेती टिकवून ठेवणारे हे शेतकरी परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. यामध्ये खंडू भोंडवे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडिबा उर्फ मामा भोंडवे, माजी संचालक व प्रगतिशील शेतकरी मधुकर भोंडवे, पोलिस पाटील दिवाणजी भोंडवे, मनोहर भोंडवे,माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, बाळकृष्ण भोंडवे, सुरेश भोंडवे यांचा समावेश आहे. पूर्ण शहरीकरणाच्या उंबरठ्यावर असतानाही शेती जपण्याचा हे शेतकरी प्रयत्न करत आहेत. त्यांनी रावेतची शेतीपरंपरा आजही जिवंत ठेवली आहे.
थंडीमुळे खोडवा उसाला चांगले कोंब फुटले आहेत. पवना नदीचे पाणी आणि हवामान पोषक असल्याने उसाची वाढ समाधानकारक आहे. वाढत्या शहरीकरणातही शेती टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- मधुकर भोंडवे, प्रगतशील शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

