देहूरोड कॅन्टोन्मेंटमध्ये स्वच्छतेचा देखावा
देहूरोड, ता. ११ : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत जुना जकात नाका ते पुणे गेट हॉटेल दरम्यान बुधवारी ठेकेदाराचे तब्बल दहा सफाई कामगार सेवा रस्त्यावर स्वच्छता करताना दिसले. प्रत्यक्ष पाहणी केली असता या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विशेष स्वच्छतेची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हे काम केवळ देखाव्यासाठी आणि कुणाचे तरी खिसे भरण्यासाठी सुरू असल्याची चर्चा नागरिकांत रंगली आहे.
कॅन्टोन्मेंट हद्दीतील अनेक भागांत कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ गटारे आणि रस्त्यांच्या कडेला पडलेला राडारोडा अशी भयंकर स्थिती आहे. अशावेळी गरज नसलेल्या सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लावणे म्हणजे करदात्यांच्या पैशांची उघड उधळपट्टी असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जिथे खरेच स्वच्छतेची गरज आहे, तेथे कामगार दिसत नाहीत; मात्र स्वच्छ असलेल्या भागात कामाचा देखावा केला जात आहे.
दरम्यान, याच परिसरात काही अंतरावर विरुद्ध बाजूला असलेल्या लष्करी जागेत रस्त्यालगत साचलेला कचरा उचलण्याऐवजी तो जाळला जात असल्याचेही बुधवारी निदर्शनास आले. त्यामुळे परिसरात धूर पसरून प्रदूषण वाढले आगे. आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब गंभीर असून कॅन्टोन्मेंटच्या आरोग्य विभागासाठी निश्चितच भूषणावह नाही, अशा शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला.
---
रस्त्याच्या बाजूला काही नागरिक कचरा टाकतात. कॅन्टोन्मेंटचे सीईओ या मार्गाने ये-जा करतात. स्वच्छतेबाबत कॅन्टोन्मेंटचे नाव खराब होऊ नये म्हणून आठवड्यातून एक दिवस येथे कामगार लावले जातात. कचरा जाळला जात असल्याबाबत तक्रार आली असून ही बाब गांभीर्याने घेतली जाईल.
- किरण गोंटे, आरोग्य निरीक्षक, कॅन्टोन्मेंट
रस्त्याच्या बाजूला नागरिक कचरा कसा टाकतात ? हा प्रकार थांबवला गेला पाहिजे.
- बाळासाहेब जाधव, चिंचोली ग्रामस्थ
चिंचोली प्रवेशद्वार ते शनी मंदिर दरम्यान काही नागरिक उघड्यावर कचरा टाकतात. हा कचरा कॅन्टोन्मेंटकडून वेळेवर उचलला जात नसल्याचे चित्र आहे.
- पंडितराव जाधव, चिंचोली ग्रामस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

