हनीट्रॅपद्वारे लुटणारी टोळी बारा तासांमध्ये जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हनीट्रॅपद्वारे लुटणारी टोळी
बारा तासांमध्ये जेरबंद
हनीट्रॅपद्वारे लुटणारी टोळी बारा तासांमध्ये जेरबंद

हनीट्रॅपद्वारे लुटणारी टोळी बारा तासांमध्ये जेरबंद

sakal_logo
By

कामशेत, ता. ८ ः हनी ट्रॅपद्वारे युवकांना लुटणाऱ्या टोळीला कामशेत पोलिसांनी शिर्डी येथून अटक केली आहे. बारा तासांच्या आत पोलिसांनी ही कारवाई केली.
आरोपींनी युवकांना नग्न करत, त्यांची छायाचित्रे सोशल मिडीयावर अपलोड करण्याची धमकी देत त्यांच्याकडे दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. तसेच त्यांना मारहाणही करण्यात आली.
प्रतीक ऊर्फ लाया अर्जुन निळकंठ, रूपेश ऊर्फ कवठ्या विजय लालगुडे, सतीश कृष्णकुमार बिडलाम, रोहित गणेश चोपडे (सर्वजण रा. कामशेत), साहिल महादेव भिसे (रा. चिंचवड) व महिला आरोपी (रा. वडगाव मावळ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बेडसे (ता. मावळ) येथील २४ वर्षीय युवकाने कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपीने बेडसे येथील फिर्यादी व त्याचे मित्र यांच्या मोबाईलवर फोन करून, त्यांना शिवशंकर मंगल कार्यालयाजवळ भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार फिर्यादी व त्याचे चार मित्र भेटण्यासाठी गेले. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या साथीदारांना बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना पिस्तुलाचा धाक दाखवून, तुमच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, अशी भीती घालून त्यांचे अपहरण केले.
त्यानंतर त्यांना कुसगाव येथील एका डोंगरात नेवून, त्यांची नग्न छायाचित्रे काढली व दोन लाख रुपये द्या नाहीतर तुमची छायाचित्रे व्हायरल करतो, अशी धमकी दिली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी नाकाबंदी केली. मात्र, पोलिसांना गुंगारा देत आरोपींनी शिर्डी गाठली. पोलिसांनी पाठलाग करून, त्यांना अटक केली.