शिलाटणे येथील जखमी मुलाचा मृत्यू शिवज्योत आणताना ताथवडेजवळील अपघात, आठवडाभर मृत्यूशी झुंज अपयशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिलाटणे येथील जखमी मुलाचा मृत्यू
शिवज्योत आणताना ताथवडेजवळील अपघात, आठवडाभर मृत्यूशी झुंज अपयशी
शिलाटणे येथील जखमी मुलाचा मृत्यू शिवज्योत आणताना ताथवडेजवळील अपघात, आठवडाभर मृत्यूशी झुंज अपयशी

शिलाटणे येथील जखमी मुलाचा मृत्यू शिवज्योत आणताना ताथवडेजवळील अपघात, आठवडाभर मृत्यूशी झुंज अपयशी

sakal_logo
By

लोणावळा, ता. १६ ः शिलाटणे येथील जखमींपैकी १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. आर्यन सोमनाथ कोंडभर
(वय-१२) असे मृत्युमुखी पडलेल्या शिवभक्ताचे नाव आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १० मार्च रोजी शिलाटणे येथील युवक शिवज्योत आणण्यासाठी मल्हारगड, (ता. पुरंदर) येथे गेले होते. शिवज्योत घेऊन परतत असताना ताथवडे येथे पहाटे साडेचारला पाठीमागून आलेल्या भरधाव मालवाहू ट्रकने पायी चाललेल्या शिवभक्तांना आणि त्यांच्या वाहनांना जोरदार धडक दिली होती.
या अपघातात आर्यनसह शिवज्योत घेऊन येणारे तेहतीस युवक जखमी झाले होते. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर होती. जखमी आर्यनवर रावेत येथील ओजस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्याच्या मेंदूला मार लागला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अखेर आठवडाभर सुरू असलेली त्याची मृत्यूशी झुंज अखेर संपली. गुरुवारी त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे शिलाटणे गावावर शोककळा पसरली आहे.

दोघांची प्रकृती अद्याप गंभीर
या अपघातात शिलाटणे गावातील तेहतीस युवक जखमी झाले होते. यात अल्पवयीन मुलांचा भरणा अधिक होता. जखमींपैकी दोन युवकांची प्रकृती अद्याप गंभीर असून, सर्व जखमींची प्रकृती सुधारावी, यासाठी ग्रामस्थांनी देव पाण्यात ठेवले आहेत. सहा जणांवर उपचार करून, घरी सोडण्यात आले आहे.

आर्यन हुशार विद्यार्थी
आर्यन हा कार्ला येथील श्री दुर्गा परमेश्वरी विद्यानिकेतन विद्यालयात सहावीत शिकत होता. शाळेतर्फे घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आर्यन याने प्रदूषण नियंत्रणावर प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले होते, अशी माहिती शाळेच्यावतीने देण्यात आली.

छायाचित्र: LON23B02405 (आर्यन कोंडभर)