हुल्लडबाजी केल्यास कडक कारवाई

हुल्लडबाजी केल्यास कडक कारवाई

Published on

लोणावळा, ता. ८ : लोणावळा-खंडाळ्यात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी जाणार असाल तर तुम्हाला विशेष खबरदारी घ्यावी लागेल. कारण पर्यटनस्थळी हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिस कडक कारवाई करणार आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळल्यास थेट जेलची हवा खावी लागणार आहे. पावसाळी पर्यटनाचा हंगामात गर्दीमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर ताण येतो. त्याचा त्रास स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांना होतो. त्यामुळे वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.

लोणावळ्यात सुरू असलेल्या पावसामुळे वर्षाविहारासाठी लोणावळा, खंडाळा परिसरात शनिवार व रविवारी पर्यटकांची अलोट गर्दी होत आहे. या गर्दीमुळे व त्यांच्या वाहनांमुळे पुणे-मुंबई महामार्गासह भुशी रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनाही त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कार्ला, वेहेरगाव, भाजे, लोहगड, राजमाची परिसरात पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन उपाययोजना आखल्या आहेत.

स्वयंसेवक दलाची उभारणी
पर्यटनस्थळी गर्दीवर नियंत्रण, वाहतूक कोंडी व पर्यटकांची सुरक्षा या हेतूने खबरदारी घेण्यात येत आहे, यासाठी लोणावळा पोलिस स्वयंसेवक दलाची उभारणी करण्यात येत आहे अशी माहिती सहायक पोलिस अधीक्षक तथा लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी दिली. यामध्ये स्वेच्छेने काम करणाऱ्या स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात येत आहे. स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, महाविद्यालयीन तसेच राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी जवान, खासगी सुरक्षा दलाची मदत घेतली जाणार आहे.

मळवलीत टपऱ्या, हातगाड्यांवर कारवाई
शनिवार व रविवारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांच्या वतीने कार्ला, मळवली, भाजे रस्त्यालगत असणाऱ्या टपऱ्या, हातगाड्यांसह वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली. गेल्या रविवारी लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाल्याने पर्यटकांचीच कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते.

‘मावळातील पर्यटकांना सुविधा द्या’
पर्यटकांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करीत मावळातील पर्यटकांना सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे केली आहे. मावळातील लोणावळा, अंदर मावळ, नाणे मावळ व पवन मावळ व विविध भागात पर्यटक मोठया प्रमाणावर वर्षाविहार व धार्मिक स्थळ यांना भेट देण्यासाठी येत असतात. मावळातील अर्थकारण पर्यटनावर अवलंबून आहे. लोणावळा विभागात भुशी येते वाहतूक कोंडीचा स्थानिक नागरिक व पर्यटक यांना त्रास होतो. अंदर मावळात टाकवे-वडेश्वर रस्त्याचे काम सुरू आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात होऊ शकतो. नाणे मावळमधील वडिवळे नव्याने पूल होत असून, तेथील पर्यायी रस्ता वाहून गेला आहे. स्थानिक शेतकरी, कामगार, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कार्ला, एकवीरा देवी येथे येणारे भाविकांची संख्या पाहता गडावर अपघात होऊ नये, पार्किंग व ट्रॅफिक बाबत ग्रामस्थांशी बोलून मार्ग काढावा. विजेच्या समस्येवर मार्ग काढावा, लोहगडला जाणारे शिवभक्तांना कुठल्याही अडचणी येऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.