भुशी धरण परिसरातील शेकडो टपऱ्या हटविल्या

भुशी धरण परिसरातील शेकडो टपऱ्या हटविल्या

लोणावळा, ता. २ : भुशी धरण परिसरात दोन कुटुंबे वाहून गेल्यानंतर झोपलेल्या प्रशासन खडबडून जागे झाले आहे. भविष्यात अशी दुर्घटना घडू नये, यासाठी मंगळवारी (ता.२) मोठा फौजफाटा घेत लोणावळा नगरपरिषद, रेल्वे आणि वन खात्याच्यावतीने भुशी धरण परिसरातील शेकडो टपऱ्यांवर अतिक्रमण विरोधी संयुक्त कारवाई करण्यात आली. त्यामध्ये, छोटी हॉटेल्स, फेरीवाले, चना-चाट विक्रेत्यांचाही समावेश होता.
लोणावळ्यातील दमदार पावसाने सर्वाधिक पसंतीचे केंद्र असलेले भुशी धरण हे तुडूंब भरून वाहू लागले आहे. भुशी धरणाच्या सांडव्यावर भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. वास्तविक, भुशी धरण हे रेल्वेच्या मालकीचे असून आजूबाजूचा परिसर हा वन खात्याच्या अखत्यारीत येतो. मात्र, याठिकाणी व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने अतिक्रमणे केली होती.

धरणाच्या दोन्ही बाजूंकडील टपऱ्या जमीनदोस्त
भुशी धरणामागील धबधब्यांत रविवारी पाच जण बुडून मृत्यू पावल्याच्या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेत कारवाईला सुरुवात केली आहे. कारवाईत धरणाच्या दोन्ही बाजूकडील तसेच धरणाकडे जाणाऱ्या मार्गातील अनधिकृत टपऱ्या, दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. कारवाईवेळी रेल्वे पोलिस दल आणि लोणावळा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


महामार्गावरील अतिक्रमणे आठ दिवसांत काढणार
प्रत्येक विकेंडला पर्यटकांची होणारी गर्दी व वाहतूक कोंडी यामुळे संभाव्य अपघाताची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी उपाय-योजना करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर, मावळ-मुळशीचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आयआरबी कंपनी आदी विभागांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व रस्त्यांच्या बाजूला झालेली अतिक्रमणे आठ दिवसांत हटविण्याचे आदेश दिले आहेत.

कारवाईमुळे व्यावसायिकांची नाराजी
प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता ऐन हंगामात आणि भर पावसात कारवाई केल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली. भुशी दुर्घटना दुर्दैवी असून त्याचा फटका स्थानिकांना बसणार आहे. उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने कारवाईमुळे स्थानिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यावसायिकांनी दिली.


तर कदाचित ‘त्यांचा’ जीव वाचला असता...
पर्यटकांचा निष्काळजीपणामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. भुशी धरणाच्या या भागात जाण्यासाठी बंदी आहे. तेथे जाऊ नये यासाठी मनाई फलक लावण्यात आला आहे. तरीही अन्सारी कुटुंब या धबधब्याकडे गेले होते. धबधब्याच्या परिसरातील सावधानतेचा, प्रवेश बंदीचा फलक वाचला असता; तर रविवारच्या घटनेतील मृतांचा जीव कदाचित वाचला असता असे बोलले जात आहे.

LON24B03703, LON24B03704, LON24B03705

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com