पर्यटननगरीत ढोल-ताशांच्या गजरात गणरायास निरोप
लोणावळा, ता. ७ : ढोल-ताशांचा गजर, ‘डीजे’चा दणदणाट आणि गुलालाची मुक्त उधळण करत, गेले दहा दिवस मनोभावे पूजा केलेल्या लाडक्या गणरायास ‘पुढच्या वर्षी लवकर या...’ असा जयघोष करत वरुणराजाच्या साक्षीने पर्यटननगरी लोणावळ्यात उत्साहपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. भर पावसात भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते. मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
मानाचा पहिला गणपती रायवूड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती दुपारी तीन वाजता सहाय्यक पोलिस अधीक्षक गजानन टोणपे, पोलिस निरीक्षक राजेश रामाघारे, नंदूशेठ वाळंज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत व नारळ वाढवत रायवूडचा गणपती मंडपातून निघाला. पावणेपाच वाजण्याच्या सुमारास मानाचा पहिला गणपती मावळा पुतळा चौकात दाखल झाला. मात्र, मानाचा दुसरा गणपती गावठाण येथील तरुण मराठा मित्र मंडळ पोचण्यास एक तास उशीर झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास मावळा पुतळा येथून मिरवणुकीस सुरवात झाली.
मानाचा तिसरा गणपती श्री संत रोहिदास मंडळ व त्यानंतर अनुक्रमे चौथे आणि पाचवे मंडळ असलेले गवळीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वळवण येथील शेतकरी भजनी मंडळ ही मानाची पाच गणेश मंडळे विसर्जन मिरवणुकीत लगोलग दाखल झाली.
नगरपालिकेच्या वतीने हुडको येथील महिला मंडळाशेजारी कृत्रिम विसर्जन हौद तयार करण्यात आला होता. बहुतेक नागरिक व मंडळांनी मिरवणुकीस फाटा देत या हौदात, टाटांचा लोणावळा तलाव, वलवण तलाव, तुंगार्ली येथे विसर्जन केले.
तानाजी युवक मित्र मंडळ, श्रीमंत नेहरू मित्र मंडळ, इराणी चाळ, गुरुदत्त मित्र मंडळ तसेच इतर छोट्या मंडळांनी मिरवणुकीत सहभाग टाळत स्वतंत्र मिरवणूक काढली. रायवूड गणेश मंडळाचा गणपती रात्री साडेआठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाला. साडेदहाच्या सुमारास विसर्जन झाले. मानाच्या पहिल्या पाच गणेश मंडळाच्या मूर्तींच्या विसर्जनास रात्री साडेअकरा वाजले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोणावळा नगरपालिका, पोलिस ठाणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मनसेच्या वतीने स्वागतकक्ष उभारण्यात आले होते. दरम्यान, मंडळाचे अध्यक्ष, ढोल-ताशा पथकातील मानकऱ्यांचा सत्कार करण्यात येत होता. तर, जयचंद चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने गणेश मंडळाचे स्वागत झाले. लोणावळा व्यापारी संघटनेच्या वतीनेही स्वागत करण्यात येत होते.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेश भक्तांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अन्नदान करण्यात आले. सत्यनारायण मंदिर कमिटी, लायन्स क्लब लोणावळा-खंडाळा, सद्गुरू ईश्वरदास सत्संग मंडळ, संत रामदेवबाबा मंडळाच्या वतीने भाविकांना अल्पोपहार व चहा वाटप करण्यात आले.
विसर्जन मिरवणुकीची वैशिष्ठ्ये
- बहुतेक मंडळांची फुलांची आकर्षक सजावट
- वरुणराजाच्या साक्षीने विसर्जन
- तरुण मराठा मंडळाच्या मिरवणुकीत बालवारकऱ्यांचा सहभाग
- गुलालाची मुक्तहस्त उधळण
- मिरवणुकीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
- ढोल-ताशांचा गजर व ‘डीजे’चा दणदणाट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.