लोणावळ्यातील ‘स्कार वॉक’ला गती
लोणावळा, ता. १२ : लोणावळ्याजवळील कुरवंडे गावात उभारण्यात येणाऱ्या टायगर पॉइंट येथील स्काय वॉक प्रकल्पाबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार होते. या प्रकल्पासाठी पाच फेब्रुवारी २०२४ रोजी ३३३ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. हा प्रकल्प मावळ तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रकल्पात पर्यटकांसाठी अनेक सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामध्ये प्रवेशद्वार, तिकिटघर, फूड कोर्ट, स्नॅक बार, वाहनतळ आणि समारंभ हॉल यांचा समावेश आहे. तसेच साहसी खेळांसाठी साईटसीईंग, झिप लाईन, बंजी जंपिंग, वॉल क्लाइंबिंग आणि फेरीस व्हीलसारख्या अॅक्टिव्हिटी असतील.
मनोरंजन व सुरक्षेसाठी झुला, रेन डान्स, स्केटिंग रिंक, पाण्याची टाकी, सीसीटीव्ही कॅमेरे, ध्वनीप्रणाली व लायटिंग यांचा समावेश केला जाणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल. स्थानिकांसाठी दरमहा ध्वजवंदन सोहळा आणि स्कायवॉकचा अनुभव देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. अॅडव्हेंचर आणि अम्युझमेंट पार्कच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील पर्यटन वाढवण्याचा हेतू आहे. तसेच टेंटिंग व इतर निवास सुविधा उभारून पर्यटकांसाठी मुक्कामाचीही सोय केली जाणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मावळ तालुक्याला ‘पर्यटन तालुका’ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन ग्रामीण भागाचा विकास होईल, असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.
या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सुनील शेळके सुभाष शिरोळे, राजेश रासमुथ, रमेश जाणपुथकर, योगेश मेस्त्री मंगेश वानखेडे, गणेश ढोरे, दीपक हुलावळे, साहेबराव कारके, विठ्ठलराव शिंदे आदी उपस्थित होते.
कुरवंडे येथील हा महत्वकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोणावळा पर्यटनाला नवे रूप मिळेल आणि मावळ तालुका राज्यातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून उदयास येईल.
- सुनील शेळके, आमदार
मुंबई ः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कुरवंडे गावातील प्रस्तावित टायगर पॉइंट प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली.
छायाचित्र: LON25B04715
लोणावळा: प्रस्तावित ग्लास स्कायवॉक
छायाचित्र: LON25B04716