लोणावळ्यात ‘वंदे मातरम्’ गीताने आसमंत व्यापला
लोणावळा, ता. ७ : लोणावळा, कार्ला, कामशेत परिसरातील ३० शाळांमधील तब्बल पाच हजार विद्यार्थी आणि एक हजार नागरिकांनी एकत्र येऊन ‘वंदे मातरम’चे सामूहिक गायन करत जयघोष केला.
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘वंदे मातरम’ या अमर राष्ट्रगीताला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने देशभर विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राष्ट्रभक्तीपर उपक्रमांतून याचे स्मरण व्हावे यासाठी येथील शिवसेवा प्रतिष्ठान, मावळवार्ता फाउंडेशन, शिवदुर्ग मित्र, हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण, लोणावळा आयटीआय यांचे संयुक्त विद्यमाने व लोणावळा नगरपरिषदेच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात विशेष मंच व ध्वनी व्यवस्थेची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना दृढ करणे हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्वातंत्र्ययुद्धात प्रत्येक भारतीयात देशभक्तीची ज्योत पेटविणारे ‘वंदे मातरम्’ राष्ट्राचा आत्मा आत्मा आहे, असे मत स्वरूपवर्धीनीचे शिरीष पटवर्धन यांनी व्यक्त केले. शिवसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक धनंजय चंद्रात्रे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला पालक आणि नागरिक उपस्थित होते.

