

लोणावळ्यात भाजपला अनपेक्षित धक्का
वलवण, तुंगार्लीमधील अधिकृत उमेदवाराची राष्ट्रवादीसोबत तडजोड; उमेदवारी अर्ज मागे
लोणावळा, ता. २१ : आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजपकडून अधिकृत अर्ज दाखल केलेल्या जुना खंडाळा प्रभाग क्रमांक १२ मधून सर्वसाधारण गटातून अभय पारख यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला.
त्याचबरोबर तुंगार्ली प्रभाग क्र. दोनमधून दीपिका विजय इंगुळकर, वलवण प्रभाग तीनमधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून अश्विनी अरुण लाड यांनी उमेदवारी अचानक मागे घेतली. राष्ट्रवादी काँग्रेससोबत ‘अडीच-अडीच वर्षांची’ सत्तावाटप तडजोड झाल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने अचानक अर्ज मागे घेतल्याने भाजपला धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या या नव्या समीकरणामुळे लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत नव्या घडामोडींना सुरूवात झाली आहे.नगराध्यक्षपदासाठी सहाजण तर नगरसेवक पदाच्या २७ जागांसाठी ११४ उमेदवार रिंगणात आहेत.
अखेरच्या दिवशी वीस जणांची माघार
अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या अशोक हरिभाऊ मानकर, विनायक शिंदे यांच्यासह वीस जणांनी उमेदवारी अर्ज अखेरच्या दिवशी माघारी घेतले आहे. अर्ज माघारीपर्यंत अनेक उमेदवारांवर दबाव होता. उमेदवारांना अनेकांकडून फोन जात होते. नगरपरिषदेत अखेरच्या क्षणापर्यंत वाटाघाटी सुरू होत्या. एकूण ३३ जणांनी अर्ज माघारी घेतले आहे.
अर्ज माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट
नगराध्यक्ष पदासाठी प्रमुखाने भाजपकडून गिरीश कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र सोनवणे, शिवसेना-रिपाइं युतीचे सूर्यकांत वाघमारे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजेंद्र दिवेकर प्रमुख लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. बलराज रिले, शशिकांत जाधव हेही अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तुंगार्ली प्रभाग दोनमधून दीपिका इंगुळकर यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिता आंभुरे तसेच वलवण प्रभाग क्रमांक तीनमधून अनुसूचित जाती प्रवर्गातून शिवसेनेच्या राजेश देसाई व अन्य अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने श्वेता माधव पाळेकर- गायकवाड या बिनविरोध झाल्या आहेत. भांगरवाडी प्रभागातून भाजपचे देविदास कडू हे यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत. अधिकृत पक्षांच्या उमेदवारांचा प्रचाराचा धडाका अगोदरच सुरू आहे. बुधवारी (ता. २६) अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे. त्यानंतरच त्यांचा प्रचार खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.