बोरघाटात प्रचंड कोंडी

बोरघाटात प्रचंड कोंडी

Published on

लोणावळा, ता. १३ : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील बोरघाटात शनिवारी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. वीकएन्ड आणि सुट्टीच्या दिवसांमुळे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. पूर्ण दिवस कोंडीचा ठरल्याने प्रवासी त्रस्त झाले.
बोरघाटातील अरुंद वळणे, अवजड वाहनांची गर्दी तसेच काही ठिकाणी वाहनचालकांनी लेनची शिस्त न पाळल्याने वाहतूक संथ झाली. परिणामी अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा काही किलोमीटरपर्यंत होत्या. काही प्रवासी दोन ते तीन तासांहून जास्त वेळ कोंडीत अडकून पडले.
कोंडीचा सर्वाधिक फटका खाजगी वाहने, बस तसेच अवजड वाहनांना बसला. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना कोंडीत अडकून मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक प्रवाशांनी उष्णता, पाण्याची कमतरता आणि वेळेवर नियोजित ठिकाणी वेळे पोहोचण्याबाबत चिंता व्यक्त केली.
दरम्यान, प्रशासनाने सुटीच्या दिवशी वाहतूक नियोजन अधिक प्रभावीपणे राबवावे. लेनची शिस्त न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. बोरघाटात वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे प्रवाशांचा वेळ व इंधनाचा अपव्यय होत असून यावर कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज असल्याचेही नागरिकांनी म्हटले आहे.

---
पाच ते सहा किमी रांगा
वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांनी दस्तुरी पॉइंट व बोरघाट पोलिस मदत केंद्राजवळ ब्लॉक घेऊन वाहतूक दोन्ही मार्गांनी वळविली. अवजड वाहनांची वाहतूक नियंत्रित करत काही प्रमाणात कोंडी कमी करण्यात यश आले. या दरम्यान खंडाळा बोगद्याजवळ काही काळ वाहतूक थांबविण्यात आली. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर आडोशी व खंडाळा एक्झिटपर्यंत वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी बराच वेळ लागला.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com