महिला आरोग्य अधिकाऱ्याविरुद्ध आरोग्य केंद्रातील सेविकांची तक्रार
लोणावळा, ता. १७ : लोणावळा येथील नागरी आरोग्य केंद्रातील अधिपरिचारिका कांचन केंद्रे यांच्या वर्तनाबाबत आरोग्य सेविकांनी तक्रार दाखल केली आहे. त्या सतत मानसिक छळ, धमक्या, अपमानास्पद वागणूक देत असून कामात अडथळे आणत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
वरिष्ठांना माहिती देण्याच्या प्रक्रियेत मुद्दाम अडथळे आणले जातात. कामाबाबत विचारल्यास मोठ्या आवाजात ओरडले जाते. त्यामुळे कामाचे वातावरण बिघडले असून नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांवरही परिणाम होत आहे. संबंधित अधिकारी पदाचा गैरवापर करून दबाव टाकतात. वेळेवर साहित्य उपलब्ध करून दिले जात नाही, कामाच्या ठिकाणी अनावश्यक हस्तक्षेप होतो, राजकीय संबंधांचा उल्लेख करून भयभीत केले जाते असेही आरोप आहेत. यामुळे तीव्र मानसिक तणाव सहन करावा लागत असून वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाबाबत आरोग्य सेविकांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तक्रारीची दखल
या तक्रारीची दखल घेत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक साळुंखे यांच्या चौकशी समितीने मंगळवारी (ता. १६) रुग्णालयास प्रत्यक्ष भेट दिली. यात रुग्णसेवा, औषधपुरवठा, स्वच्छता, कर्मचारी उपस्थिती तसेच उपचार पद्धतींबाबत पाहणी करण्यात आली. आरोग्य सेविका, आशा सेविका व इतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. याचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असल्याचे समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
-----

