उर्वरित दोन जागांसाठी 
शनिवारी मतदान, प्रशासन सज्ज

उर्वरित दोन जागांसाठी शनिवारी मतदान, प्रशासन सज्ज

Published on

लोणावळा, ता. १८ : लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील उर्वरित दोन जागांसाठी शनिवारी (ता. २०) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून, सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या एकूण २७ जागांपैकी यापूर्वीच तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित २२ जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, दोन प्रभागांतील जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली होती. त्यानुसार गवळीवाडा प्रभाग क्रमांक १० अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) आणि नांगरगाव प्रभाग क्रमांक ५ ब (सर्वसाधारण) या दोन जागांसाठी आता मतदान होत आहे. गवळीवाडा येथे भाजप व काँग्रेसमध्ये सरळ लढत होत आहे. तर नांगरगाव येथे एका जागेसाठी अपक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप मिळून तीन उमेदवार रिंगणात आहेत. या दोन जागांसाठीचा प्रचार गुरुवारी (ता. १८) संपला असून प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी, सभा आणि प्रचार फेऱ्यांद्वारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आता सर्वांचे लक्ष शनिवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेकडे लागले आहे. रविवारी (ता. २१) लोणावळा नगरपरिषद प्रशासकीय इमारतीमधील वाहनतळाच्या जागेत मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहे.
मतदानासाठी एकूण आठ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. नांगरगाव प्रभागासाठी रेल्वे ज्ञानदीप्ती स्कूल, लोणावळा नगरपरिषद लोकमान्य टिळक विद्यालय आणि नांगरगाव अग्निशमन केंद्र येथे मतदान केंद्र असतील. तर, गवळीवाडा प्रभागात गवळीवाडा शाळा क्रमांक सहा, पुणे वनविभाग विश्रामगृह खंडाळा, व्हिपीएस हायस्कूल लोणावळा आदी ठिकाणी मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत.
मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली असून कर्मचारी, पोलिस बंदोबस्त आणि इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
---

Marathi News Esakal
www.esakal.com