लोणावळ्यात दोन जागांसाठी शांततेत मतदान
लोणावळा, ता. २० : लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीतील उर्वरित दोन प्रभागांतील जागांसाठी शनिवारी (ता. २०) मतदान प्रक्रिया शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. रविवारी (ता.२१) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगरपरिषदेच्या एकूण २७ पैकी तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. २२ जागांसाठी दोन डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली होती. मात्र, दोन प्रभागांतील जागांसाठी काही कारणांमुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी गवळीवाडा प्रभाग क्रमांक १० अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला) आणि नांगरगाव प्रभाग क्रमांक ५ ब (सर्वसाधारण) या दोन जागांसाठी मतदान घेण्यात आले. मतदानासाठी एकूण आठ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.
नांगरगाव प्रभागासाठी रेल्वे ज्ञानदीप्ती स्कूल, लोणावळा नगरपरिषद लोकमान्य टिळक विद्यालय तसेच नांगरगाव अग्निशमन केंद्र येथे मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. गवळीवाडा प्रभागात गवळीवाडा शाळा क्रमांक सहा, पुणे वनविभागाचे विश्रामगृह (खंडाळा) आणि व्ही. पी. एस. हायस्कूल, लोणावळा येथे मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. गवळीवाडा प्रभागात भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली, तर नांगरगाव प्रभागात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एका अपक्ष उमेदवारात तिरंगी लढत रंगली. विशेषतः नांगरगावमध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या चुरशीने मतदान झाले. मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. गवळीवाडा व नांगरगाव येथे दोन ठिकाणी बाचाबाचीच्या किरकोळ घटना घडल्या, मात्र त्याचा मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम झाला नाही.
५० टक्क्यांवर मतदान
नांगरगाव, गवळीवाडा प्रभागात दोन जागांसाठी सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरवात झाली. पहिल्या दोन तासांत विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्या दोन तासांत सरासरी दहा टक्के मतदान झाले. सकाळी ९.३० ते ३.३० या वेळेत नांगरगाव प्रभागात ६०.४५ टक्के मतदान नोंदले गेले. यामध्ये ९५३ पुरुष व १०३६ महिला मतदारांचा समावेश आहे. गवळीवाडा प्रभागात ५२.६४ टक्के मतदान झाले. यामध्ये ८४५ पुरुष तर ८३८ महिलांचा समावेश आहे.
---
छायाचित्र: LON25B05012
छायाचित्र: LON25B05013
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

