बोरघाटातील वाहतूक ४४ तासांनंतर पूर्वपदावर
लोणावळा, ता. ५ : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात वायू गळती झालेला टँकर गुरुवारी (ता.५) मध्यरात्री एकच्या सुमारास हटवण्यात आला. त्यानंतर दीडच्या सुमारास मुंबईकडे जाणारी मार्गिका सुरू करण्यात आली. मात्र, अपघातामुळे निर्माण झालेली परिस्थिती, वाहनांची गर्दी, दूरवर रांगांमुळे वाहतूक संथ गतीनेच सुरू होती. दरम्यान, मंगळवारी (ता.३) सायंकाळी साडेपाचपासून विस्कळित झालेली वाहतूक तब्बल ४४ तासांनंतर म्हणजेच गुरुवारी दुपारनंतर पूर्वपदावर आली.
आडोशी बोगद्याजवळ उलटलेला ज्वलनशील वायू भरलेला टँकर हटविण्यासाठी प्रशासन, अग्निशमन दल आणि महामार्ग पोलिसांची दमछाक झाली. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने परिसराची तपासणी करून वायू गळती पूर्णपणे थांबल्यानंतरच वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अडकलेली वाहने, अवजड वाहनांची संख्या आणि बोरघाटातील उतार-चढामुळे परिस्थिती पूर्ववत होण्यास वेळ लागला. गुरुवारी सकाळच्या सत्रात काही ठिकाणी वाहनांना थांबून-थांबून पुढे जावे लागत होते.
कंटेनर बंद पडल्याने कोंडी
खंडाळा घाटातील वाहतूक रात्रीनंतर सुरू झाली असली, तरी सकाळी लोणावळ्याच्या अलीकडे परिस्थिती ‘जैसे थे’ होती. मळवली-कार्ला मार्गावर कंटेनर बंद पडल्याने महामार्गावर पुन्हा कोंडी झाली. सुमारे पाच-सहा किलोमीटर दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. जुन्या महामार्गावर वरसोली टोलनाका ते शिलाटणे, तसेच द्रुतगती मार्गावर खंडाळा ते औंढेदरम्यान वाहतूक खोळंबली होती.
चालकांचा मुक्काम वाहनांतच
महामार्ग नेमका कधी सुरू होणार, याविषयीची कसलीही माहिती व शाश्वती वाहनचालकांना नव्हती. त्यामुळे अनेक चालकांनी रात्रभर वाहनांमध्येच मुक्काम केला. अखेर पोलिसांनी वाहनचालकांना जागे केले. त्यानंतर वाहने पुढे जाण्यास सुरुवात झाली.
टोल वसुलीचा फटका
टँकरचा अपघात, वाहतुकीचा खोळंबा झाला असतानाच टोल प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे वाहनचालकांची कोंडी झाली. पण, तरीही टोल वसुली सुरूच होती. त्यामुळे ‘वेळही गेला आणि पैसाही गेला’ अशा कात्रीत प्रवासी अडकले. वाहनचालकांनी समाजमाध्यमांवर संताप व्यक्त केला. अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) आयआरबी कंपनीच्या खालापूर नाक्यावरील वाहतूक टोलमुक्त करण्याचे आदेश दिले, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’ अधिकाऱ्यांनी दिली.
सेवा न देता टोल वसूल करणे हा नियमभंग आहे. दंडासह टोल परत द्या आणि जबाबदारी निश्चित करा. नागरिकांनी टोल भरला, पण ते कोंडीत अडकले. राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांनुसार ३ मिनिटांपेक्षा जास्त प्रतीक्षा व १०० मीटरपेक्षा जास्त रांग असल्यास वाहनांना मोफत सोडणे बंधनकारक आहे.
- विजय कुंभार, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

