कुसगाव बु.–काले जिल्हा परिषद गट निकाल

कुसगाव बु.–काले जिल्हा परिषद गट निकाल
Published on

ग्रामपंचायतीची दिशा ठरवणारा निकाल

कुसगाव बु.-काले गट

लोणावळा, ता.९ : कुसगाव बु.-काले जिल्हा परिषद गटाचा निकाल हा केवळ एका जागेचा निकाल न राहता, मावळ तालुक्यातील राजकीय समीकरणे, पक्षांतर्गत हालचाली आणि नेतृत्वाचा प्रभाव अधोरेखित करणारा ठरला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे तालुकाध्यक्ष राहिलेले दत्तात्रय गुंड यांचा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष राऊत यांनी ५ हजार ६५५ मतांनी पराभव केला.
मतदार संघाची नव्याने रचना होत काले आणि कुसगाव बु. हे दोन गट जोडले गेले. त्यामुळे खरं तर या गटात भाजपचा प्रभाव मानला जात होता, मात्र मतदारांनी तो फोल ठरविला. दुसरीकडे निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीबाबत गोंधळ सुरू होता. अनेक इच्छुक, गटबाजी आणि चर्चांमुळे उमेदवारी भाजपच्या पथ्यावर पडेल, अशी चर्चा होती. मात्र, अखेर संतोष राऊत यांनी बाजी मारत राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी मिळवली. प्रचाराच्या टप्प्यात तरुणाईचा आणि स्थानिक पातळीवरील मतदारांचा मिळालेला पाठिंबा यामुळे राष्ट्रवादीचा विजय सुकर झाला. भाजपचे उमेदवार दत्तात्रेय गुंड यांचा काही काळ मतदारांशी संपर्क तुटलेला राहिला होता. मात्र, उमेदवारीच्या प्रबळ दावेदारीतून गुंड यांनी मतदार संघ पिंजून काढत उणिवा भरून काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पुरेसा ठरला नाही.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश केलेले भगवान उर्फ दादा डफळ तसेच धीरज गरवड यांच्या बंडखोरीचा फटका नेमका कुणाला बसेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. प्रत्यक्ष निकालात ही बंडखोरी निर्णायक ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ती फोल ठरली.
उमेदवारीचा गोंधळ आणि बंडखोरी असतानाही मतदारांना एकसंघ ठेवण्यात आमदार सुनील शेळके यांची भूमिका निर्णायक ठरली. हा निकाल आगामी स्थानिक ग्रामपंचायतींच्या राजकारणाची दिशा ठरवणारा मानला जात आहे.
-------
अनपेक्षित उमेदवारी अन् तरुणाईचा पाठिंबा
कुसगाव बु. गण

लोणावळा : पंचायत समितीच्या कुसगाव बु. गणात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार योगेश लोहर यांनी भाजपचे उमेदवार नवनाथ हारपुडे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला.
ध्यानी-मनी नसताना अचानक मिळालेल्या उमेदवारीमुळे योगेश लोहर यांच्या नावाची सुरुवातीपासून चर्चा होती. लोहर यांच्या रूपाने सर्व बाजूंनी तगडा उमेदवार पुढे आणत आमदार शेळके यांनी ‘ट्रम्प कार्ड’ खेळले असल्याचे बोलले जात होते. अखेर निकालानंतर हे स्पष्ट झाले. विशेषतः तरुण मतदारांचा प्रचंड पाठिंबा हा लोहर यांच्या विजयाचा निर्णायक घटक ठरला. युवकांमध्ये असलेली त्यांची विश्वासार्ह प्रतिमा, सहज उपलब्धता आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी उभी राहिली. पारंपरिक मतदारांबरोबरच नवमतदारांना जोडण्यात लोहर यशस्वी ठरले. त्यामुळे अनुभवी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध त्यांनी आघाडी घेत विजयाची पताका फडकावली.
लोहर कुटुंबाचा प्रभाव, राजकीय वारसा, आणि स्थानिक नातेसंबंध यांचाही या विजयात मोलाचा वाटा असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्याउलट भाजपचे उमेदवार नवनाथ हारपुडे यांना शेवटच्या क्षणी पुढे आणल्याने त्यांना प्रचारासाठी पुरेसा अवधी मिळाला नाही.

राजकीय समीकरणे बदलली
या निकालामुळे कुसगाव गणातील राजकीय समीकरणे बदलली असून राष्ट्रवादी काँग्रेसला संजीवनी मिळाल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे भाजपसाठी हा पराभव आत्मपरीक्षणास भाग पाडणारा ठरला आहे. एकूणच, अनपेक्षित उमेदवारीतून आत्मविश्वास, तरुणाईचा पाठिंबा आणि स्थानिक मुद्द्यांच्या जोरावर मिळवलेला हा विजय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडणारा आहे.
--------

नियोजनबद्ध प्रचारामुळे विजय, वर्चस्व
काले गण

लोणावळा : काले गणात भाजपच बाजी मारणार असे चित्र रंगविले जात असतानाच प्रचारातील सुसूत्रता व नियोजनबद्ध प्रचाराच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शैला रामचंद्र कालेकर यांनी भाजपच्या सीमा मुकुंद ठाकर यांच्यावर मात केली.
गेली कित्येक वर्षे काले गणावर भाजपचा प्रभाव होता. त्यामुळे शांत आणि संयमी चेहरा असलेल्या सीमा मुकुंद ठाकर या भाजपच्या उमेदवार बाजी मारणार अशी सुरुवातीपासून चर्चा होती. मात्र, प्रचारातील सुसूत्रता व पॅनल टू पॅनल केलेला प्रचार यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने शैला कालेकर यांच्या रूपाने विजयश्री खेचून आणली.

राष्ट्रवादीच्या उमेदवार शैला कालेकर यांनी नातेसंबंध व ग्रामपंचायत कार्यकाळातील आपला अनुभव कामी आणला. निवडणूक प्रक्रियेत पवना जलवाहिनीचा मुद्दा चर्चेत राहण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र प्रत्यक्षात हा मुद्दा फारसा पुढे आला नाही. त्यात माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनानंतर सहनभूतीचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला.
तर दुसरीकडे भाजपचे स्थानिक नेतृत्व म्हणावे तितक्या ताकदीने प्रचार कार्यात उतरले नाही, त्यामुळे या विस्कळित प्रचार यंत्रणेचा फटका भाजपला बसला. शैला कालेकर यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना रस्ते, पाणीपुरवठा, सिमेंट काँक्रीट रस्ते, शाळा-अंगणवाडी सुविधा, स्वच्छता, महिलांचे सक्षमीकरण अशा विविध विकासकामांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com