

लोणावळा, ता. ७ : लोणावळ्यातील तुंगार्ली येथील गोल्ड व्हॅली परिसरातील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
लोणावळा शहर व परिसरात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, आठवडाभरात चोरीच्या दोन घटना समोर आल्याने चोरट्यांनी लोणावळा पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. विशेषतः बंद बंगले व घरांना लक्ष्य केले जात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी गणेश चोपडे (वय ३२, केअरटेकर) यांनी फिर्याद दिली असून, लोणावळा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुंगार्ली येथील गोल्ड व्हॅली, ई-सेक्टरमधील बंगल्यात ही चोरी झाली. शुक्रवार (ता. ४) ते शनिवार (ता. ५) या दरम्यान अज्ञात चोरट्याने बंगल्यात प्रवेश केला. चोरट्याने घरातील कपाटातील लॉकर फोडून त्यामध्ये ठेवलेली तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
विशेष म्हणजे, घराच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून त्यानंतर कपाटातील लॉकर फोडण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे गोल्ड व्हॅलीसह तुंगार्ली परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्यटननगरी म्हणून लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात बंगले व फार्महाऊस असून, अनेक घरे काही काळासाठी बंद असतात. अशा बंद घरांवर चोरट्यांची नजर असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सीसीटीव्ही तोडून चोरी
या घटनेत चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केल्याने चोरीपूर्वी परिसराची पाहणी करण्यात आली होती का? तसेच चोरट्यांना बंगल्यात रोकड असल्याची माहिती होती का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. आठवडाभरात चोरीच्या दोन घटना घडल्याने लोणावळा शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून संशयित व्यक्तींची तपासणी करावी आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.