
मोशीतील रिकाम्या भूखंडांची स्वच्छता करण्याची मागणी
मोशी, ता. ३० : मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक ४ मधील लोंढे उद्यानाशेजारील प्राधिकरणाच्या आरक्षित रिकाम्या भूखंडामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पाणगवत, झाडेझुडपे वाढली आहेत. तर काही नागरिकांनी राडारोडा व कचरा मोठ्या प्रमाणावर टाकला आहे. परिणामी दुर्गंधी व डासांचाही प्रादूर्भाव वाढल्याने स्थानिक नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या भूखंडांची स्वच्छता करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्यावतीने मोशी प्राधिकरणाचा नियोजनबद्ध असा विकास केला आहे. नागरिकांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी प्राधिकरणाने आरक्षणे टाकून भूखंड आरक्षित केले आहेत. त्यावर कोणी अतिक्रमण करू नये म्हणून त्याभोवती सीमा भिंती उभारल्या आहेत तर काही भूखंड सीमाभिंतीशिवायही पडून आहेत. तिथे सध्या पाणगवत, झाडेझुडपे वाढली आहेत. तसेच काही नागरिकांनी राडारोडा व कचरा टाकला आहे. या भूखंडाच्या परिसरातील विविध गृहनिर्माण संस्थांसह येथून ये-जा करणाऱ्या स्थानिक नागरिकांना दुर्गंधी, डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्राधिकरणातील भूखंडांची स्वच्छता करण्याची मागणी होऊ लागली आहे.
फोटो ः 01915, 01916