मोशी, डुडुळगावातील पदपथांवर अतिक्रमणे
मोशी, ता. १२ : पदपथ नेमके कोणासाठी ? पादचारी की विक्रेत्यांसाठी, असा प्रश्न उपस्थित केला आहे मोशी, डुडुळगावकरांनी. कारण, जिकडे बघावे तिकडे पदपथांवर विविध वस्तू विक्रेत्यांची अतिक्रमणे झाली आहेत. दुकानांमधील साहित्य बाहेर पदपथांवर ठेवले जात आहे. मग, पादचाऱ्यांनी चालायचे कुठून ? असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली पदपथ मोठे आणि देखणे झाले. मात्र, विविध प्रकारच्या अतिक्रमणांमुळे ते आता फक्त पादचाऱ्यांसाठी उरलेले नाहीत.
रस्त्यावरील पादचाऱ्यांचे अपघात टाळण्यासाठी पदपथ निर्माण केले गेले. परंतु हे पदपथ चालणाऱ्यांसाठी कमी आणि विक्रेत्यांच्या वस्तूंनी अधिक भरलेले दिसतात. काही ठिकाणी दुकानदारांनी पदपथांवरील ही जागा अडवल्याने पादचाऱ्यांना पदपथांऐवजी रस्त्यावरून चालावे लागते. अशात रस्त्याने जाताना एखाद्या वाहनाचा धक्का जरी लागला तरी अपघात होऊ शकतो. महापालिकेने गेल्या वर्षभरात पादचाऱ्यांच्या हक्काच्या पदपथांवरील अतिक्रमणांवर कारवाई केली ? हा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
MOS25B03830