परिचारिका कायदा नियमांत बदल करण्याची मागणी
मोशी, ता ११ : आयुर्वेद क्लिनिक, पंचकर्म सेंटर व आयुर्वेद हॉस्पिटल यांच्यासाठी परिचारिका कायदा (बॉम्बे नर्सिंग अॅक्ट) आणि (बायो-मेडिकल वेस्ट) जैविक कचरा नियमावलीत बदल करावेत, अशी मागणी आयुर्वेद वैद्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली.
मुंबई येथे मंत्रालयात राज्यातील आयुर्वेद वैद्यांनी आबिटकर यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या भेटीत आयुर्वेद वैद्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीसाठी मर्म संस्थेचे अध्यक्ष अजित राजिगरे यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच निमा आयुर्वेद फोरम सेंट्रल कौन्सिलचे अध्यक्ष नीलेश लोंढे, खजिनदार महेश पाटील, सभासद सागर अर्डक, ग्लोबल आयुर्वेद प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, खजिनदार श्याम जगताप, निमा महाराष्ट्र आयुर्वेद फोरमचे अध्यक्ष अमोल ठवळी, निमा पिंपरी चिंचवड अध्यक्ष प्रताप सोमवंशी, महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन आणि आयुर्वेद व्यासपीठ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
आयुर्वेद हॉस्पिटल, क्लिनिक व पंचकर्म सेंटरमध्ये नर्सिंग स्टाफऐवजी प्रशिक्षित पंचकर्म थेरपिस्ट व पेशंट असिस्टंट स्टाफ आवश्यक आहे, त्यानुसार नियमांत तरतूद व्हावी. आयुर्वेदिक उपचारांमधून अल्प प्रमाणात जैविक कचरा निर्माण होत असल्याने वेगळी व्यवस्था करावी. शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी स्वतंत्र तरतुदी व्हाव्यात आदी वैद्यांच्या मागण्या आहेत.