पश्चिम बंगालच्या समृद्ध संस्कृतीचे मोशीकरांना दर्शन
मोशी, ता. ३० : आनंदधारा प्रभासी संस्थेच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त मोशी येथे दुर्गापूजेचा बहारदार उत्सव आयोजित करण्यात आला असून त्यामधील सजावट आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमधून भाविकांना समृद्ध बंगाली संस्कृतीचे दर्शन घडत आहे. बंगाली वाद्ये आणि पारंपरिक आरतीच्या स्वरांनी परिसर भारावून गेला आहे.
मोशीतील रामकृष्ण मंगल कार्यालयात हा नवरात्रोत्सव सुरू आहे. पश्चिम बंगालच्या लोकजीवनाशी घट्ट निगडित असलेल्या या पर्वाचा अनुभव मोशीकरांना मिळावा, या हेतूने संस्थेने अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांची मांडणी केली आहे.
पश्चिम बंगालच्या परंपरेनुसार भव्य आणि आकर्षक अशा दुर्गामातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. सभोवतालच्या मंडपाची अलंकारिक रचनाही बंगाली पद्धतीने करण्यात आली असून सजावटही रंगीबेरंगी आहे. बंगाली ढोल-धाक, शंखनाद आणि पारंपरिक आरतीच्या स्वरांनी परिसर भारावून गेला आहे. उत्सवाचे स्वरूप केवळ पूजा किंवा धार्मिक विधींवर मर्यादित न ठेवता संस्थेने ते सांस्कृतिक महोत्सवाच्या रूपात विस्तारले आहे. लहान मुलांसाठी चित्रकला, पारंपरिक धुनची नृत्य, दांडिया स्पर्धा, सेरा बौंधन, बँड वादन आदी कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात आले आहे. तसेच बंगाली खाद्यसंस्कृतीच्या आस्वादाबरोबर स्थानिक चवींचीही सांगड घालून उत्सव अधिक आकर्षक बनविण्यात आला आहे.
या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी इस्कॉन संस्थेचे रामेश्वरानंद, माजी नगरसेवक वसंत बोराटे आणि आनंदधारा प्रभासी या संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दुर्गापूजा हा फक्त धार्मिक विधी नसून समाजाला एकत्र आणणारा आणि विविध संस्कृतींना एकत्रित मंच देणारा उत्सव आहे. मोशीतील सर्व समाज घटकांनी त्यामध्ये सहभाग घेऊन परस्परांतील ऐक्य अधिक दृढ करावे, हा आमचा प्रयत्न असल्याचे आनंदधारा प्रभासी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
विविधतेचा संगम साधणाऱ्या दुर्गापूजेच्या उत्सवामुळे समाज जीवनात उत्साह, बंधुता आणि सांस्कृतिक समृद्धीची नवी उमेद जागृत झाली आहे. हा उत्सव केवळ बंगाली बांधवांचा न राहता संपूर्ण परिसराचा सण बनला आहे. हीच खरी या महोत्सवाची यशोगाथा म्हणावी लागेल.
- स्वामी योगनाथानंद, मठाधिपती, रामकृष्ण मठ
MOS25B03892
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.