स्वच्छ प्राधिकरण रेडियम कचऱ्याने ‘अस्वच्छ’
मोशी, ता. १२ : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात येणाऱ्या वाहनांच्या विविध कामांमुळे मोशी प्राधिकरणातील स्वच्छ व सुंदर रस्त्यांवर रेडियमसह अन्य कचऱ्याचा ढीग वाढू लागला आहे. स्टिकर्स, शुभेच्छा पट्ट्या व सजावटीच्या वस्तू यांचे टाकाऊ अवशेष पदपथ व रस्त्यावर टाकले जात असल्याने परिसराचे सौंदर्य मलिन होत आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) प्रवासी वाहनांना रेडियम लावणे अनिवार्य केल्याने अनेक चालक रिक्षा, चारचाकी, टेम्पो, मिनी ट्रक, बस आदी वाहने घेऊन येथे येतात. वाहन सजवणारे आणि रेडियम विक्रेते कार्यालय परिसरातच उभे राहून काम करतात. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर कापलेल्या रेडियमच्या पट्ट्या, टेपचे तुकडे, प्लास्टिक कचरा हे सर्व रस्त्यांवरच टाकून जातात.
दररोज सकाळी नागरिक व्यायाम करायला येतात. मात्र, रेडियम कचरा त्यांच्या निदर्शनास येत आहे. आरटीओ प्रशासन, प्राधिकरण व महापालिका मिळून संयुक्त कारवाई करून या रेडियम विक्रेत्यांवर नियमबद्ध नियंत्रण आणावे तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी फलक, कचरापेट्या व दंडात्मक व्यवस्था लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सकाळी आम्ही येथे चालण्यासाठी येतो. पण, रस्त्यावर पडलेल्या रेडियम पट्ट्यांमुळे घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण होतो.
- प्रमोद काळे, स्थानिक नागरिक
आरटीओ परिसर स्वच्छ ठेवणे, ही येथे रेडियम आणि सजावटीच्या वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची जबाबदारी आहे. आरटीओ आणि महापालिकेच्या आरोग्य विभागानेही एकत्र येऊन या अस्वच्छतेला आळा घालावा.
- प्रेरणा शिंदे, स्थानिक नागरिक
MOS25B04022

