स्मार्ट किड्स प्री-स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
मोशी, ता. २३ ः विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील आत्मविश्वास व सर्जनशीलता वाढावी या उद्देशाने स्मार्ट किड्स प्री-स्कूल व विस्डम इंटरनॅशनल स्कूल, मोशी येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
यंदाच्या स्नेहसंमेलनाची संकल्पना अतुल्य भारत अशी होती. या संकल्पनेअंतर्गत भारताची समृद्ध संस्कृती, विविध परंपरा, देशाची वैज्ञानिक प्रगती दर्शविणारे चंद्रयान-३ अभियान तसेच सामाजिक संदेश देणारे ऑपरेशन सिंदूर यांचे सादरीकरण विविध नृत्यप्रकार, नाट्य सादरीकरणांतून करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने व नृत्याने उपस्थित रसिकांची मने जिंकून घेतली.
ऑपरेशन सिंदूर या विषयावर आधारित नाटक कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. या नाटकातून विद्यार्थ्यांनी सामाजिक भान, संवेदनशीलता व देशभक्तीचा प्रभावी संदेश दिला.
या कार्यक्रमासाठी मनोवैज्ञानिक डॉ. अहिल्या शिंदे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. लहान वयातच मुलांमध्ये कलात्मकता, विचारशक्ती व भावनिक विकास घडविणे ही आजच्या शिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास शाळेच्या संस्थापिका तृप्ती बढेकर यांच्यासह संस्थेचे इतर सभासद, शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संस्थापिका बढेकर यांनी प्रमुख पाहुण्या डॉ. शिंदे यांचे मार्गदर्शनाबद्दल व उपस्थितीबद्दल आभार मानले तसेच विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामागे शिक्षक व पालकांच्या सहकार्याचे विशेष कौतुक केले.

