नवकल्पना, पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे अग्रेसर

नवकल्पना, पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे अग्रेसर

Published on

आमची सोसायटी - आमचा उपक्रम
ऐश्वर्यम सहकारी गृहरचना संस्था, आकुर्डी


संजय चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा

निगडी, ता.२८ ः गतीशील व झपाट्याने विकसित होणाऱ्या आकुर्डी परिसरातील ऐश्वर्यम सहकारी गृहरचना संस्था हे केवळ एक निवासी संकुल न राहता सामाजिक सलोखा, सांस्कृतिक समरसता आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यांचे उत्कृष्ट उदाहरण बनली आहे. भविष्यात सोसायटीला शंभर टक्के सौर उर्जायुक्त करायचे आहे. १ हजार ५०० हून झाडे लावून ऑक्सिजन पार्क बनविण्याचा सोसायटीचा मानस आहे.
ऐश्वर्यम सोसायटीत ४३५ हून अधिक सदनिका असून जवळपास १ हजार ६०० हून अधिक रहिवासी इथे वास्तव्यास आहेत. ऐश्वर्यम सोसायटी ही एक सुसंस्कृत, पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि उपक्रमशील जीवनशैलीचे उदाहरण बनली आहे. रहिवाशांमधील सुसंवाद, कार्यक्रमांमधील उत्साह आणि व्यवस्थापनातील पारदर्शकता यामुळे ही सोसायटी परिसरातील इतर संकुलांसाठी एक आदर्श मॉडेल बनली आहे.

सण-उत्सवांचा उत्साह
वर्षभर विविध सण, उत्सव, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरे केले जातात.
गणेशोत्सव, रामनवमी आणि स्वातंत्र्य दिनी सोसायटीमध्ये प्रभात फेरीचे आयोजन केले जाते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण त्यात सहभागी होतात. दिवाळी पहाट, कोजागरी पौर्णिमा, नवरात्र, पर्यावरण दिन, योग दिन, होळी व दसरा साजरा केला जातो. गणपती उत्सवात दररोज भजन, नृत्य, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामूहिक आरत्यांमुळे संपूर्ण सोसायटी एकत्र येते. नवरात्र उत्सवातील दांडिया नाईट हे महिलांसाठी विशेष आकर्षण असते.

सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प
ऐश्वर्यम सोसायटीने ६४ किलोवॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प बसविला आहे. त्यामुळे सामायिक क्षेत्रातील वीज खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. सौर उर्जेचा वापर लिफ्ट, पंप, विद्युत व्यवस्था यासाठी केला जातो. ही योजना पर्यावरण रक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरली आहे. नेट मीटरिंग करून सौर उर्जेद्वारे निर्माण होणारी वीज महावितरणला दिली जाते आणि त्याबदल्यात सोसायटीच्या देयकामधून वीज कपात केली जाते.

उच्चतंत्रज्ञानयुक्त सुरक्षा यंत्रणा
सोसायटी ६५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांखाली निगराणीत आहे. २२ सुरक्षा रक्षक, व्हिडीओ डोअर फोन आणि अॅप-बेस्ड व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम कार्यरत आहेत. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि निर्धास्त वातावरण मिळते. भविष्यात बायोमेट्रिक एंट्री करण्याचा मानस आहे.

एसटीपी प्रकल्पामुळे पाण्याची बचत
सोसायटीमध्ये १०० किलोलिटर प्रति दिन (केएलडी) क्षमतेचा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) आहे. याद्वारे स्वच्छ केलेले पाणी फ्लशसाठी वापरले जाते. पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेसाठी स्वतंत्र पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यरत आहे. सोसायटी आवारात सध्या ५०० झाडे आहेत. खेळाचे मैदान, ओपन जीम व खेळण्याच्या सुविधा आहे.

भविष्यासाठी संकल्प
ऐश्वर्यम सोसायटीचे रहिवासी आणि व्यवस्थापन भविष्यात हरित ऊर्जा, प्लास्टिकमुक्त परिसर, जलसंधारण, वृक्षारोपण यासारख्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी कटिबद्ध आहेत. नवीन पिढीला सामाजिक जाणीव देण्यासाठी शिक्षणात्मक कार्यक्रम तर महिलांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित करण्याचीही योजना आहे.

आमची सोसायटी ही एक परिवार म्हणून काम करते. सर्व धर्माच्या नागरिकांचा सहभाग ही आमची शक्ती आहे. भविष्यात सोसायटीला १०० टक्के सौरउर्जायुक्त करायचे आहे. १ हजार ५०० झाडे लावून ऑक्सिजन पार्क बनविण्याचा आमचा मानस आहे. पर्यावरणपूरक कामासह सांस्कृतिक, धार्मिक व खेळविषयक कार्यक्रम हे समाज जोडण्याचे माध्यम झाले आहे. आम्ही विविध वयोगटांना एकत्र आणून एक सशक्त आणि सक्रिय समाज घडवत
आहोत.
- नितीन गोळे, अध्यक्ष, ऐश्वर्यम सोसायटी, आकुर्डी

आमच्या सोसायटीतील प्रत्येक सदस्य आमचे कुटुंब आहे. एकत्र येऊन आम्ही कोणताही उपक्रम राबवतो. नवकल्पना, पर्यावरणपूरक उपक्रम आणि सामाजिक सलोखा हे आमचे उद्दिष्ट आहे.
- डॉ. गौरव पाटील, सचिव, ऐश्वर्यम सोसायटी, आकुर्डी

आम्ही सोसायटीच्या अर्थकारणात पारदर्शकता आणि शिस्त ठेवतो. प्रत्येक उपक्रमाचा खर्च योग्य प्रकारे नियोजनबद्ध केला जातो आणि त्याची रहिवाशांना वेळोवेळी माहिती दिली जाते.
- डॉ. सुनील मामुलवार, कोषाध्यक्ष, ऐश्वर्यम सोसायटी, आकुर्डी

ऐश्वर्यम सोसायटीमध्ये राहणे म्हणजे आम्हाला आपल्या गावात राहण्यासारखे वाटते. सण-उत्सव, खेळ, महिलांचे कार्यक्रम, लहान मुलांची स्पर्धा यामुळे आनंदी वातावरण असते. सुरक्षा, स्वच्छता आणि शांतता यामुळे आम्ही इथे समाधानी आहोत. महिलांसाठी योग शिकवले जात असल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. महिलांच्या कलागुणांना वाव दिला जातो.
- शरयू शेटे, रहिवासी, ऐश्वर्यम सोसायटी, आकुर्डी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com