रावेत परिसरात नवीन स्मार्ट मीटर बसविणे सुरू

रावेत परिसरात नवीन स्मार्ट मीटर बसविणे सुरू

Published on

संजय चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा
रावेत, ता.२३ ः रावेत, आकुर्डी, मामुर्डी, प्राधिकरण परिसरात महावितरणकडून नवीन डिजीटल व स्मार्ट मीटर (टीओडी) बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. या मीटरमुळे रीडिंग स्वयंचलितरीत्या अद्ययावत होणार आहे. रावेत परिसरातील एकूण ७० हजार ग्राहकांपैकी सुमारे १५ हजार ग्राहकांना स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आले आहेत. येत्या दोन महिन्यांत उर्वरित ग्राहकांना हे मीटर बसविण्याचे महावितरण कंपनीचे लक्ष्य आहे.
कोणत्याही वीज ग्राहकांना त्यांचे वीजबिल त्यांच्या वापरानुसार अचूक व वेळेत मिळावे ही अपेक्षा असते. त्यामुळे महावितरण कंपनीकडून रिडींगसाठी नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारून वीजबिल तयार करण्यावर भर देत आहे. वीजमीटरचे रीडिंग घेण्यासाठी लागणारा वेळ व त्यामध्ये होणाऱ्या मानवी चुका टाळण्यासाठी महावितरणने आता ‘टीओडी’ मीटर बसविण्याचे धोरण स्वीकारले आहे.

‘महाविद्युत’ ॲप विकसित
सध्या वीज ग्राहकाला आपला वीजेचा वापर किती झाला ? हे जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष मीटरवर पाहावे लागते. मात्र, महावितरणने आता ‘महाविद्युत ॲप’ विकसित केले असून त्यावर वीजेचा वापर किती झाला हे मोबाईलमधून केव्हाही व कोठूनही तपासण्याची सुविधा देण्यात आली आहे.

‘टीओडी’ मीटरचे फायदे
- महावितरणकडून विनामूल्य बसविले जाणार
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अचूक वीजबिल मिळणार
- रीडिंग घेण्यासाठी कोणा बाह्यव्यक्ती अथवा कर्मचाऱ्यांची गरज नाही
- ठरलेल्या तारखेला व काही क्षणांत मीटरची रीडिंग ऑनलाइन प्राप्त
- वीजबिल विनाविलंब तयार होऊन ग्राहकाला उपलब्ध
- प्रत्येक युनिटचे मोजमाप अचूक व संगणकीकृत पद्धतीने तयार
- वीज चोरीवर नियंत्रण, छेडछाड करणे अशक्य
- वीज वापराची माहिती मिळाल्याने वीज बचत शक्य
- उच्च वापर, बिघाड किंवा इतर समस्यांसाठी (स्मार्ट अलर्टस) सूचना मिळतात

‘टीओडी’च्या अडचणी
- नवीन तंत्रज्ञान समजून घेण्यात ग्राहकांना वेळ लागणे
- तांत्रिक बिघाड होण्याचा धोका
- संगणकीकृत प्रणाली असल्याने सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याची गरज
- माहिती पाहण्यासाठी स्मार्टफोन वापरणे गरजेचे
- मीटरचे रीडिंग जाणून घेण्यासाठी मोबाइल/इंटरनेट साक्षरतेची गरज

‘टीओडी’ची गरज का ?
सौरउर्जेमुळे महावितरणला स्वस्त विजेची उपलब्धता दिवसा अधिक होत आहे. ही स्वस्त वीज ग्राहकांना दिवसा उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन ‘टीओडी’ मीटर आवश्यक आहे. कारण, आता दिवसाच्या वीज वापरावर महावितरणकडून सूट दिली जाणार आहे. विशिष्ट वेळेस वीजदर कमी असल्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात बचत होणार आहे.


स्मार्ट (टीओडी) मीटर बसविण्याची ही मोहीम जानेवारी २०२५ पासून सुरू झाली आहे. आतापर्यंत रावेत परिसरात एकूण ७० हजार ग्राहकांपैकी सुमारे १५ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. उर्वरित ग्राहकांना येत्या दोन महिन्यांत हे मीटर बसवण्याचे लक्ष्य आहे. स्मार्ट मिटर असल्याने रीडिंग स्वयंचलितरीत्या अद्ययावत होणार आहे. शिवाय ग्राहकांचा आर्थिक फायदा होणार आहे. स्मार्ट मीटर बसविण्यासाठी ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा अधिकचे शुल्क द्यावे लागणार नाही.
- किरण सरवदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण


आमच्या सोसायटीमध्ये २५ टक्क्यांपर्यंत मीटर बसविण्यात आले आहेत. लवकरच १०० टक्के स्मार्ट मीटर बसविण्यात येतील. यामुळे वीज बिल आणि विजेची बचत होणार आहे. काही तुरळक कारणांमुळे काहींचा विरोध आहे. मात्र, फायदे समजल्यास त्यांचाही
विरोध होणार नाही.
- प्राजक्ता रुद्रवार, अध्यक्षा, रावेत सोसायटी फेडरेशन

सुरुवातीला आम्हाला शंका वाटत होती की जुने मीटर बदलल्याने बिल वाढेल. पण, प्रत्यक्षात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबतचे प्रात्याक्षिक दाखविल्याने आमचा गैरसमज दूर झाला. आता आमचे बिल पूर्वीपेक्षाही थोडे कमी येते. शिवाय मोबाइलवर वापराची माहिती मिळते हे फारच सोयीचे आहे.
- समदेश शिंदे, रहिवासी
PNE25V33649, PNE25V33650, NGI25B00666

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com