रावेत पोलिस ठाण्यासमोर मद्यपी, गर्दुल्यांचा धिंगाणा
रावेत, ता. २९ ः रावेत पोलिस ठाण्यासमोरील सोसायट्यांमधील भरदिवसाही गर्दुले, मद्यपी रस्त्यावर नशा करून झिंगत असल्यामुळे नजीकच्या सोसायट्यांमधील रहिवाशांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. संध्याकाळनंतर मद्यपी, गर्दुल्यांचा उपद्रव वाढत आहे. रावेत पोलिस ठाण्यासमोरच हे सर्व प्रकार चालले असताना आमच्याकडे कुणाच्या तक्रारी आल्या नाहीत, असे अजब उत्तर पोलिस अधिकारी देत आहेत.
प्राधिकरण पेठ क्र. ३४ मध्ये मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स, देशी व विदेशी दारू दुकाने आणि वाईन शॉप्स उघडण्यात आली आहेत. या दुकानांतून मद्य घेऊन अनेकजण जवळच महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडावर तसेच सार्वजनिक ठिकाणी थांबून नशा करत असतात. काही जण तर झाडांखालीच झोपून राहतात. संध्याकाळी व रात्री या परिसरात मद्याच्या नशेत बडबड, आरडाओरडा करणारे आणि गैरवर्तन करणारे मद्यपींची संख्या वाढली आहे. उघड्यावर सिगारेट फुकत असल्यामुळे मुले आणि मुली सर्रासपणे नशा करताना दिसतात.
काय आहेत तक्रारी ?
- महिलांवर शेरेबाजी करणे
- मुलांना घाबरुन सोडणे, टोळके करुन बसणे
- रात्री उशिरा मोठमोठ्या आवाजात बोलणे
- परिसरात अस्वच्छता करतात
‘‘आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. महिलांवर शेरेबाजी करणे, मुलांना घाबरविणे. हा रोजचा अनुभव झाला आहे. आमच्या सोसायटीच्या खालीच देशी दारूचे दुकान सुरू झाल्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. महिला आणि मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. आमच्या सोसायटीची पिण्याच्या पाण्याची टाकी देशी दारूच्या दुकानाजवळच आहे. त्यामुळे मद्यपी मोठ्या प्रमाणात घाण करतात आणि थुंकतात. बाटल्यांचा थर साचलेला असतो.’’
- गोकुळ गुगळे, स्थानिक रहिवासी
‘‘आमचे रहिवासी क्षेत्र असून किमान १५ ते २० लहान-मोठ्या शाळा व शिकवणी वर्ग आहेत. त्यांच्या अगदी जवळच देशी दारू आणि मोठे वाईन शॉप्स आहेत. देशी दारूच्या दुकानांजवळ अनेक मद्यपी नशा करून पडलेले असतात. महाविद्यालयीन मुली व परिसरातील महिलांना याचा त्रास होता.’’
- अर्चना सुराणा, स्थानिक रहिवासी
आमच्याकडे अजून काही तक्रारी नाही. तशा तक्रारी नागरिकांनी दिल्यास त्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल.
- नितीन फटांगरे, पोलिस निरीक्षक, रावेत पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.