
रावेत, ता. २४ ः पावसाने उघडीप दिल्याने रावेत परिसरातील जनजीवन पूर्वपदावर आले असून स्थलांतरीत कुटुंबे स्वगृही परतली आहेत. महानगरपालिका प्रशासनाकडून पूरबाधित भागांत साफसफाई, औषध फवारणीची कामे सुरू करण्यात आली आहेत. दूषित पाण्यापासून रोगराईपासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष पथक तैनात केले आहे. त्याद्वारे जनजागृती केली जात आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रावेत परिसरातील पवना नदी पात्राजवळील नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले. काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणावर पाणी साचले. अनेक वसाहतींमध्ये पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. रस्ते, दुकाने व वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, आता पावसाचे प्रमाण कमी झाल्याने हळूहळू परिस्थिती पूर्ववत होऊ लागली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून प्रभाग क्रमांक १६ मधील जाधव घाट, किवळे स्मशानभूमी लेबर कॅम्प, वाल्हेकरवाडी आणि महाराष्ट्र कॉलनी भागांतील नागरिकांना महापालिका प्रशासनाने तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले. जाधव घाट परिसरातून एकूण ५८ नागरिकांपैकी २२ नागरिकांना वाल्हेकरवाडी महापालिका शाळेत आश्रय देण्यात आला. किवळे स्मशानभूमी लगत असलेल्या लेबर कॅम्पमधील ५४० कामगारांना म्हाडाच्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले. याशिवाय, महाराष्ट्र कॉलनीतील ५० नागरिकांना हलविण्यात आले होते. ही सर्व मंडळी आपल्या घरी परत आली आहेत. तसेच लेबर कॅम्पमधील कामगार देखील आपल्या कामावर रुजू झाले आहेत.
महानगरपालिका प्रशासनाकडून पूरग्रस्त भागांत साफसफाई, औषध फवारणी व दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. दूषित पाण्यामुळे रोगराईचा फैलाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने विशेष पथक तैनात केले असून नागरिकांना उकळून पाणी पिण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
काही भागांत अजूनही रस्त्यांवर चिखल व कचरा साचल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, महापालिकेने पुन्हा एकदा स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्याचे आवाहन नागरिकांनी केली आहे. स्थानिक शाळा, महाविद्यालये व बाजारपेठांमध्ये नेहमीसारखी गती येण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.
किवळे स्मशानभूमीलगत असलेल्या लेबर कॅम्पमधील आम्हाला म्हाडाच्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले होते. आता आम्ही सर्व कामगार कॅम्पमध्ये पोहोचलो आहोत.
- प्रवीण कुमार, कामगार, लेबर कॅम्प
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.