भक्ती-शक्ती ते मुकाई चौक बीआरटी सुरू करा
रावेत, ता. १४ : निगडी येथील भक्ती - शक्ती चौक ते मुकाई चौक या बीआरटी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. अद्याप पीएमपी बस सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे, बीआरटी मार्गावरुन तातडीने बससेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
निगडी येथील भक्ती - शक्ती चौक ते मुकाई चौक मार्गावरुन दररोज हजारो नागरिक प्रवास करत असतात. सध्या या मार्गावर वाहतूक कोंडी होत असून त्याने वेळ आणि इंधन वाया जात आहे. बीआरटी सुरू झाल्यास नागरिकांना दिलासा मिळून त्यांना जलद बससेवेचा लाभ घेणे शक्य होणार आहे. परंतु, वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि वाढलेला त्रास यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, स्थानिक नागरिकांनी तातडीने मार्ग काढून मार्ग सुरू करावा अशी मागणी जोर धरत आहे. बीआरटी मार्गासाठी सर्व सुविधा तयार आहेत. पण, बससेवा सुरू होत नाही. हा प्रशासनाचा उघड हलगर्जीपणा आहे. सेवा लवकर सुरू झाली नाही; तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे.
दररोज हजारो नागरिक या मार्गावरून प्रवास करतात. वाहतूक कोंडीमुळे वेळ आणि इंधन वाया जाते. बीआरटी सुरू झाल्यास लोकांना मोठा दिलासा मिळेल. प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल.
- शांताराम भोंडवे, स्थानिक नागरिक
रोज माझ्या कार्यालयाला याच मार्गाने जाते. खूप वाहतूक कोंडी होते. बीआरटी सुरू झाल्यास मला प्रवास करण्यास मदत होईल.
- सीमा रणहंगडाळे, वाहनचालक