भोंडवे वस्ती बसथांब्याजवळ गटार तुंबून घाणपाणी रस्त्यावर
रावेत, ता.१६ : गेल्या काही दिवसांपासून रावेतमधील भोंडवे वस्ती बसथांब्या समोरच्या गटारामधून दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा प्रवाह रस्त्यावर येत आहे. त्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. विद्यार्थी, प्रवासी तसेच पादचारी नागरिकांना त्याचा सामना करावा लागत आहे.
बस थांब्याजवळ सतत पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढत आहे. परिणामी, डेंगी, हिवताप यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. स्थानिक व्यावसायिकांनीही नाराजी व्यक्त करत ग्राहक येण्यास टाळाटाळ करतात. दुर्गंधीमुळे दुकानात बसणेही कठीण झाले असल्याचे म्हटले आहे. महापालिका फक्त कागदोपत्री कामे करते. प्रत्यक्षात समस्या सोडविली जात नाही,असा आरोपही नागरिक करत आहेत.
बसथांब्यावर प्रवाशांना थांबावेच लागते. अशावेळी घाण पाण्यामुळे तेथे उभे राहणेही अशक्य झाले आहे. मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.
- मनिषा भोसले, प्रवासी
गटार तुंबले असल्यास त्याची कामगारांच्या मदतीने साफसफाई व दुरुस्तीचे काम केले जाईल.
- प्रसाद संकपाळ, कनिष्ठ अभियंता (जलनिस्सारण) ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
NGI25B00855