निगडी प्राधिकरणातील रस्त्यावर अवघ्या दोन महिन्यांत खड्डे
निगडी, ता. १६ : निगडी प्राधिकरणातील शितळादेवी मंदिर ते महाराष्ट्र बँक, आकुर्डीपर्यंतचा अंतर्गत रस्ता अवघ्या दोनच महिन्यांत खड्डेमय झाला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांसह पादचारी त्रस्त झाले आहेत. गुणवत्ताहीन कामे आणि हलगर्जीपणामुळे रस्त्यांची अशी अवस्था झाली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
अशा निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत आहे. कंत्राटदारांना जबाबदार धरून दंडात्मक कारवाई केली पाहिजे, अन्यथा हीच स्थिती कायम राहील. नागरिकांनी तातडीने दर्जेदार कामे करून सुरक्षित आणि टिकाऊ रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सकाळ-संध्याकाळी गर्दीच्यावेळेस वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. पावसाचे पाणी साचून खड्डे न दिसल्याने वाहनचालकांना धोक्याचा सामना करावा लागत आहे. अद्याप पावसाळा संपलेला नाही आणि एवढ्या कमी काळात रस्ता उखडला म्हणजे कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
- सुरेश जगताप, स्थानिक नागरिक
रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहनांची धाव कमी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढते. दुकानदारांनाही याचा त्रास होतो. प्रशासनाने कंत्राटदारांना जाब विचारावा.
- संघमेश पाटील, नागरिक