रावेतमधील रस्त्यांच्या कडेला केरकचरा
रावेत, ता. १८ : रावेत परिसरातील म्हस्के वस्ती, भोंडवे बाग कॉर्नर, मुकाई चौक रस्ता आणि औंध - बीआरटी रस्त्याच्या कडेला व पदपथावर कचरा आणि राडारोडा साचला आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी थेट रस्त्यावरच कचरा टाकल्याने भटके श्वान आणि मोकाट जनावरांचा वावर वाढला असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
या मार्गावर दररोज सकाळ-संध्याकाळ चालताना पादचारी कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे त्रस्त होत आहेत. दुर्गंधीमुळे श्वास घेणे कठीण झाले आहे. नागरिकांनी स्वच्छतेबाबत प्रशासनासोबतच स्वतःची जबाबदारीही ओळखण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. अन्यथा, येणाऱ्या पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, पोटाचे आजार अशा साथींचा धोका वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
काही महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. कुणीही स्वच्छतेची जबाबदारी घेत नाही. येथून शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिक जातात. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका आहे.
- मिलिंद कदम, स्थानिक रहिवासी
कचऱ्यामुळे भटके श्वान व मांजरींचा वावर वाढला आहे. लहान मुले खेळायला बाहेर पडली की, त्यांना धोकाच निर्माण होतो. स्वच्छ भारत मोहिमेच्या नावाखाली लाखो रुपये खर्च होतात. पण, प्रत्यक्षात आम्हालाच घाणीला तोंड द्यावे लागते.
- पूजा पाटील, नागरिक
‘‘कचरा वेळेवर उचलला जात नाही. काही ठिकाणी नागरिकसुद्धा बेजबाबदारपणे थेट रस्त्यावर कचरा टाकतात. त्यावर नियंत्रणासाठी पालिकेने दंडात्मक कारवाई करायला हवी.
- नितीन शिंदे, स्थानिक युवक
‘‘रावेत परिसरातील कचरा व राडारोडा तातडीने उचलण्याचे काम सुरू केले आहे. नागरिकांनीही निर्धारित वेळेतच कचरा द्यावा. तो रस्त्यावर टाकू नये.
- अविनाश पिसे, आरोग्य निरीक्षक, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय