पत्नीच्या प्रशिक्षणाचे पतिराजांसमोर आव्हान

पत्नीच्या प्रशिक्षणाचे पतिराजांसमोर आव्हान

Published on

निगडी, ता. १७ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक प्रभागांमध्ये नगरसेवक म्हणून मागील पाच, दहा वर्षे पदावर असूनही राखीव जागांच्या नवीन समीकरणामुळे अनेकांना आपल्या इच्छेला मुरड घालून पत्नीसाठी उमेदवारी मागण्याची वेळ आली आहे.
पक्षाकडे उमेदवारी मागण्याबरोबरच बारीकसारीक गोष्टींत श्रीमतींना मार्गदर्शन करणे पतींना भाग पडले आहे. अगदी नमस्कार करताना वापरायच्या शब्दांपासून ते वाकून कुणाला नमस्कार करायचा, विरोधकाला सुद्धा हसून कशा शुभेच्छा द्यायच्या, तरुण वर्गाशी संवाद साधताना इंग्रजी शब्दांचा कौशल्याने वापर कसा करायचा, संभाव्य पॅनेलमधील आपल्या सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण वर्तन कसे ठेवायचे, फारसा परिचय नसताना जनतेसोबत जिव्हाळ्याचे नाते आहे, असे संवाद कसे साधायचे, त्याचबरोबर प्रभागातील पक्ष बदललेल्या नवीन कार्यकर्त्यांच्या बाबतीत कसे समजावून घ्यायचे इथपासून ते आपल्या पक्षाने उमेदवारी नाकारली तर; सहजच समोरच्या कंपूत कसे सामावता आले पाहिजे, आदींबाबत पतिराजांना पत्नीचे प्रशिक्षण घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे.
याशिवाय सध्या उमेदवार वापरत असलेल्या रंग व चिन्हाचा विचार करून परिधान करायची साडी, पोशाख कसे असावेत यांसह अनेक बारकावे पत्नींना समजावून सांगावे लागत आहेत. त्यामुळे केवळ पक्षाकडेच उमेदवारी मागताना श्रीमान यांची कसोटी लागत नसून प्रत्यक्ष निवडणूक मैदानाच्या प्रभागात क्षेत्रातही पावलोपावली अनेक बारीकसारीक गोष्टींचे कळत नकळत प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. जवळचे कार्यकर्ते व श्रीमान यांच्यावर ही जबाबदारी येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रभागात फिरताना अनेक विनोदही घडत आहेत. त्याचाही आनंद समवेत फिरणाऱ्या महिला भगिनी व कार्यकर्ते सध्या घेताना दिसत आहेत.
---
राजकारण ही जीवघेणी सर्कसच!
पत्नी नगरसेविका होईल किंवा नाही हे सामान्य जनतेच्या हाती आहे. पण उमेदवारास जनतेसमोर आणताना आज सर्व श्रीमानांना विशेष प्रयत्न करावे लागताना दिसत आहेत. तेव्हा तेही म्हणतात, ‘राजकारण कुणाचेही काम नाही. ते फार सोपे नसते. अनेक पातळीवरील ती जीवघेणी सर्कसच आहे.’
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com