
उन्नती फाऊंडेशनकडून २०२३ झाडांचे वाटप
पिंपळे सौदागर, ता. २ : एक झाड लावू या, एक झाड जगवूया हा नवीन वर्षाचा संकल्प करण्याचे आवाहन उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी केले आहे. या अनुषंगाने फाउंडेशनच्यावतीने येथे २०२३ झाडे मोफत वाटप करण्यात आली.
येथील शिवार चौक व महापालिका मैदान येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष संजय भिसे, आनंद हास्य क्लब राजेंद्रनाथ जयस्वाल, अल्कोवे सोसायटीचे अध्यक्ष विजय भांगरे, वाल्मिक काटे, मधुकर पाटील, राज गुरू, पद्मिनी गवळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत कुंदा भिसे म्हणाल्या की, नवीन वर्षात प्रत्येक जण कोणता ना कोणता संकल्प करत असतो. त्याप्रमाणे आपण पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावण्याचा व ती झाडे जगवण्याचा संकल्प करूया. यासाठी आपण किमान एक तरी झाड लावून ते जगवणे गरजेचे आहे. नवीन वर्षाचे स्वागत व वर्षाची चांगली सुरूवात म्हणून उन्नती फाउंडेशनच्यावतीने विविध प्रकारची २०२३ झाडे वाटप करण्यात आली. उन्नतीच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पर्यावरण संवर्धन करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
फोटो ः 14846