
नवी सांगवी, दापोडीत अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई
जुनी सांगवी, ता. ४ ः नवी सांगवी, सांगवी, दापोडी येथे अनधिकृत फ्लेक्सवर महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली. यात पदपथ रस्त्यावर, विजेच्या खांबांवर, चौकात, रस्ता दुभाजक अशा अनेक ठिकाणी लावलेले पोस्टर्स, जाहिराती हटविण्यात आल्या आहेत.
विविध प्रकारचे प्लेक्स, किऑस्क यामुळे परिसराचे विद्रूपीकरण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा फ्लेक्स आणि होर्डिंग हटविल्याने परिसर स्वच्छ दिसत असल्याने चौकाचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी महापालिकेकडून वेळोवेळी कारवाई करावी, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणे, बस थांबे, विद्युत डी. पी. यावर सर्रासपणे जाहिराती चिकटवल्या जातात.
महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सोमवारपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. साई चौक, कृष्णा चौक, काटे पूरम चौक, जुनी सांगवी वसंत दादा पाटील पुतळा बस स्थानक, दापोडी येथील शितळा देवी चौक, आंबेडकर चौक आदी भागात कारवाई करण्यात आली. या वेळी क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निरीक्षक चंद्रकांत हुच्चे यांनी पथकासह कारवाई केली.
परिसरातील, चौकात, खांबांवर असणारे फ्लेक्स, किऑस्क आज असे २३ मोठे फ्लेक्स तर खांबावरील ८७ किऑस्क काढण्यात आले असल्याचे ‘ह’ क्षेत्रीय कारवाई पथकाकडून सांगण्यात सांगण्यात आले.