शफीक खान यांच्या कलाअविष्काराने २५ व्या ‘कलाश्री’महोत्सवाची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शफीक खान यांच्या कलाअविष्काराने 
२५ व्या ‘कलाश्री’महोत्सवाची सांगता
शफीक खान यांच्या कलाअविष्काराने २५ व्या ‘कलाश्री’महोत्सवाची सांगता

शफीक खान यांच्या कलाअविष्काराने २५ व्या ‘कलाश्री’महोत्सवाची सांगता

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. ३० ः किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित सुधाकर चव्हाण व प्रसिद्ध सतारवादक उस्ताद रफिक आणि शफीक खान यांच्या दमदार कलाविष्काराने रविवारी (ता.२९) २५ व्या कलाश्री संगीत महोत्सवाची सांगता करण्यात आली. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशीच्या पहिल्या सत्रात राधानंद संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक तबला वादन केले. त्यानंतर कलाश्री संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गायन सादर केले. पंडित सुधाकर चव्हाण यांचे गायन झाले. त्यांनी राग भीमपलासीद्वारे आपल्या गायनाची सुरूवात केली. त्यामध्ये ‘अब तो बडी बैर’ ही विलंबित एक तालातील बंदिश, तीन तालात ‘जा जा रे अपने मंदिरवा’ ही छोटा ख्याल बंदिश सादर केली. ‘विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी’ या भजनाने त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली. त्यांना नंदकिशोर ढोरे (तबला), प्रभाकर पांडव (हार्मोनिअम), गंभीर महाराज (पखवाज), शिवानंद स्वामी, संदीप गुरव आणि नामदेव शिंदे ( स्वर साथ ) यांनी साथसंगत केली.
शेवटच्या सत्रात उस्ताद रफिक आणि शफीक खान यांचे सतारवादन झाले. त्यांनी राग चंपाकलीने आपल्या वादनाची सुरूवात केली. त्यामध्ये आलाप, जोड, झाला, झपताल व तीन तालात दोन रचना सादर केल्या. त्यांच्या सतार जुगलबंदीला रसिकांनी टाळ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांना ईशान घोष यांनी तबल्यासाठी साथ केली. कार्यक्रमात रौप्य महोत्सवी वर्षाचा ‘कलाश्री’ पुरस्कार ज्येष्ठ गायक पंडित रामराव नायक यांना पंडित केशव गिंडे यांच्या हस्ते प्रदान आला. कलाश्री युवा पुरस्कार तबलावादक पांडुरंग पवार यांना पंडित अतुलकुमार उपाध्ये यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी माजी महापौर उषा ढोरे, पंडित डॉ. विकास कशाळकर, मंडळाचे सदस्य बाळासाहेब सूर्यवंशी, आरती राव, विश्वास जाधव, पांडुरंग मुखडे, सच्छीदानंद कुलकर्णी जवाहर ढोरे आदी उपस्थित होते.