
डोक्यात वार करून चिंचवडमध्ये तरुणाचा खून
पिंपरी, ता. ६ : हत्याराने डोक्यात वार करून, तरुणाचा खून केल्याची घटना चिंचवडमधील अंजठानगर येथे घडली.
बालाजी संतोष तिवारी (वय ३३, रा. देहूगाव, मूळ - बिहार) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ उत्तमकुमार संतोष तिवारी (वय १९, रा. कुदळवाडी, चिखली) याने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बालाजी हा मजुरी काम करीत होता. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास झोपडपट्टी टेकडीवरील दोन पाण्याच्या टाकींच्या मोकळ्या जागेत धारदार शस्त्राने डोक्यात वार केलेल्या अवस्थेत बालाजीचा मृतदेह आढळून आला. आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही.
--------
विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा
रस्त्याने पायी जाताना अंगावर श्वान आल्याने महिलेने जाब विचारला असता, श्वान मालकाने महिलेशी गैरवर्तन करीत तिचा विनयभंग केला. हा प्रकार चिखली येथे घडला.
सिंग निवृत्ती नरोटे (वय ३६, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महिलेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या त्यांच्या मुलीसह शतपावली करत होत्या. नरोटे हा त्याचा श्वान घेऊन आला असता, त्याचा श्वान महिलेच्या अंगावर धावला. याबाबत नरोटे याला जाब विचारला असता तो फिर्यादीला अश्लील भाषेत बोलला. फिर्यादिसह त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली.
--------------------------
देहूरोडमधील घरफोडीत ऐवज लंपास
चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडून ६४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना देहूरोडमधील दत्तनगर व आदर्शनगर येथे घडली.
पवन वासुदेव शिवणकर (वय ३५, रा. दत्तनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिवणकर यांचे भाऊ राहत असलेला फ्लॅट व त्यांच्या जवळच राहणाऱ्या अंकुश गरगडे यांचे घर बंद होते. चोरट्यांनी दोन्ही घरांचा कडी-कोयंडा तोडून घरातील ६२ हजार २०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने, दोन हजाराची रोकड असा ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
--------------------------
रिक्षाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी
रिक्षाची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जखमी झाले. हा अपघात वाकड येथील अंडरपास येथे
घडला. गणेश ज्ञानेश्वर माळी (वय ३०, रा. धनगरबाबा मंदिरासमोर, रहाटणी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षा चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी गणेश व त्यांचा मित्र अमोल हे दुचाकीवरून काळेवाडीतील डांगे चौक रस्त्याने चालले होते. वाकड येथील अंडरपासजवळ पाठीमागून भरधाव रिक्षाने त्यांना ओव्हरटेक केले. यावेळी रिक्षाचा गणेशच्या दुचाकीला धक्का बसला. यात गणेश व त्यांचा मित्र दुचाकीसह खाली पडले. रिक्षाचालक तेथे न थांबता निघून गेला. यामध्ये गणेश व त्यांचा मित्र जखमी झाले.
--------------------------