
हप्ता देण्यास नकार दिल्याने हातगाडीचालकाला मारहाण
पिंपरी : स्नॅक्सची हातगाडी लावण्यासाठी हप्ता देण्यास नकार दिल्याने एकाने हातगाडी चालकाला मारहाण केली. कोयत्याने अंड्याचे ट्रे फोडून गाडीवरील साहित्य फेकून देत नुकसान केले. ही घटना मोशीतील स्पाईन रोड येथे घडली. सुनील ऊर्फ अण्णा पिसाळ (रा. मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन विलास कदम ( रा. मोरे वस्ती, चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची स्पाईन रोडवर क्रांती चौकात स्नॅक्सची हातगाडी आहे. ते गाडी बंद करत असताना आरोपी तेथे आला. हातगाडी लावण्यासाठी त्याने कदम यांच्याकडे ५०० रुपये हप्त्याची मागणी केली. कदम यांनी हप्ता देण्यास नकार दिल्याने पिसाळ याने त्यांना मारहाण केली. कोयत्याने हातगाडीवरील अंड्याचे ट्रे व अंडी फोडून गाडीवरील साहित्य फेकून देऊन नुकसान केले.
भाडेकरूने केली घरमालकाला मारहाण
भाडेकरूला खोली खाली करण्यास सांगितल्याच्या कारणावरून घरमालकाला बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार भोसरी येथे घडला. प्रसाद सुदाम चोरगे (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय पवळे, राजेश पवळे, अजय पवळे (सर्व रा. सद्गुरुनगर, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांचा भाडेकरू विजय पवळे व शिवाजी पाटील यांचे भांडण सोडविण्यासाठी गेले. फिर्यादी यांनी विजय याला खोली करण्यास सांगितले. यावरून विजय याने फिर्यादीला शिवीगाळ करून ब्लॉक डोक्यात मारला. तसेच इतर आरोपींनीही त्यांना मारहाण करून जखमी केले.
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करीत फसवणूक केल्याप्रकरणी रणजित संजय सपकाळ (वय २८, रा. चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादीशी मैत्री करून प्रेम संबंध स्थापित केले. लग्नाचे आमिष दाखवून धमकावत वेळोवेळी अत्याचार केले. तसेच फिर्यादीच्या बँक खात्यातून फोन पे द्वारे पैसे काढून फसवणूक केली.
भरधाव मोटारीच्या धडकेत एकाचा मृत्यू
भरधाव मोटारीने धडक दिल्याने दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. अभिजित चंद्रकांत वाघमारे (वय ४९, रा. शिवतीर्थ नगर, काळेवाडी फाटा, थेरगाव) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाघमारे हे मुंबई-बंगळुरु महामार्गाने कात्रजच्या दिशेने जात होते. दरम्यान, पाठीमागून भरधाव आलेल्या मोटारीने वाघमारे यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
पावणेदोन लाखांचे दागिने चोरले
ज्वेलर्सच्या दुकानातील सेल्समन महिलेला बोलण्यात गुंतवून तीन महिलांनी पावणेदोन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या वाट्या चोरल्या. हा प्रकार भोसरी येथे घडला. शीतल सीताराम दळवी-कांगणे ( रा. धावडे आळी, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दळवी या चांदणी चौकातील भांबुर्डेकर सराफ अॅण्ड ज्वेलर्स या दुकानात सेल्समन म्हणून कामाला आहेत. त्या दुकानात असताना तीन महिला दागिने खरेदीच्या बहाण्याने त्यांच्या काऊंटरवर आल्या. दागिने पाहत असताना महिलांनी दळवी यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. दरम्यान, त्यांची नजर चुकवून एक लाख ७५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या वाट्या चोरल्या.