बत्तीस वर्षानंतर घडली मायलेकरांची भेट नवी सांगवीत सिनेमातील कथेचा प्रत्यय, बहिण- भावंडासह उपस्थितही गहिवरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बत्तीस वर्षानंतर घडली मायलेकरांची भेट
नवी सांगवीत सिनेमातील कथेचा प्रत्यय, बहिण- भावंडासह उपस्थितही गहिवरले
बत्तीस वर्षानंतर घडली मायलेकरांची भेट नवी सांगवीत सिनेमातील कथेचा प्रत्यय, बहिण- भावंडासह उपस्थितही गहिवरले

बत्तीस वर्षानंतर घडली मायलेकरांची भेट नवी सांगवीत सिनेमातील कथेचा प्रत्यय, बहिण- भावंडासह उपस्थितही गहिवरले

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १९ ः एखाद्या सिनेमातील कथेप्रमाणे बालपणीच हरवलेली आई मुलांना सिनेमाच्या शेवटी भेटते. अगदी असेच प्रत्यक्षातही घडले आहे. तब्बल बत्तीस वर्षांनंतर जुनी सांगवी येथे माय लेकरांची भेट घडली. या भेटीनंतर या दोघांसह उपस्थितांचे डोळेही पाणावले. पूनम विनोद शंकरन या सहृदयी महिलेमुळे हे शक्य झाले आहे.
पूनम हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रात नोकरीस आहेत. जुनी सांगवी येथून बसने त्या नोकरीवर जातात. गेल्या आठ- दहा दिवसांपासून एक ज्येष्ठ महिला सांगवी बस थांबा परिसरात भटकत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी सुरवातीला दोन- तीन दिवस सकाळी व सायंकाळी त्या महिलेला चहा व नाश्ता दिला. त्यांनी ही गोष्ट पती व मित्रपरिवाराला सांगितली. पूनम व त्यांचे पती विनोद यांनी त्या महिलेची आपुलकीने विचारपूस केली. त्यावेळी तिने फक्त बेल पिंपळगाव या गावाचे नाव सांगितले. या दाम्पत्याने गावाची चौकशी सुरू केली असता, एका नागरिकाने नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात बेल पिंपळगाव हे गाव असल्याचे सांगितले. पूनम यांनी तेथील पोलिस पाटील यांना व्हॉटसअपवरून या महिलेचा फोटो व वर्णन पाठवले. पोलिस पाटील संजय साठे यांनी ही महिला आपल्याच गावातील जनाबाई साहेबराव सुरसे ही असल्याचे सांगितले. लहान मुलगा ज्ञानदेव सुरसे (सध्याचे वय ३५) व मुलगी अलकाबाई राजेंद्र माळी (सध्याचे वय ४०) यांना तीस वर्षांपूर्वी सोडून घरातून निघून गेल्याची माहिती सांगितली. महिलेचा मुलगा व मुलगी याच गावात राहत असल्याचे सांगितले.

माय लेकरांची भेट
आपली आई तीस- बत्तीस वर्षांनंतर भेटणार याची ओढ व आनंद भावंडांना झाला. त्यांनी बेल पिंपळगाव येथून रुग्णवाहिका घेऊन जुनी सांगवी गाठली. आईला पाहताच भावंडांना अश्रू अनावर झाले. या प्रसंगाने उपस्थितही गहिवरले. आईचा फोटो डोळ्यांसमोर ठेवून, भाऊ व बहिणीने दिवस काढले. मात्र, आज प्रत्यक्षात आई भेटल्याने त्यांना अश्रू अनावर झाले.

सांगवी पोलिसांचे सहकार्य

गेल्या सात- आठ दिवसांपासून सांगवी पोलिसांनी पूनम यांना मदत करून, ज्येष्ठ महिलेच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी सहकार्य केले. सांगवी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मिनीनाथ वरूडे, काळू गवारी, जी. एस. ढगे, विजय शेलार, किरण खडक उमरगे यांनी प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून आईला मुलांच्या स्वाधीन केले.

‘‘माझी आई ३२ वर्षांपूर्वी मी तीन वर्षांचा असताना घर सोडून तिच्या आईकडे व मामाकडे निघून गेली. मात्र, आजी काही दिवसांनी वारल्यानंतर मामाने माझ्या आईचा सांभाळ केला नाही. त्यामुळे ती तिथूनही भरकटत निघून गेली. माझे वडीलही पंधरा वर्षापूर्वी देवाघरी गेले.
- ज्ञानदेव सुरसे, मुलगा.

‘‘मानवतेच्या भावनेतून आपण समाजाला काही तरी देणे लागतो, हीच भावना मनात ठेऊन हरवलेल्या आईची मुलांना भेट घालून दिली. याचा मनस्वी आनंद होत आहे.
पूनम शंकरन, जुनी सांगवी.

फोटोः 15208