ढोल ताशांचा निनाद लागला घुमू
गणेशोत्सवासाठी पथकांकडून वादन सरावास प्रारंभ

ढोल ताशांचा निनाद लागला घुमू गणेशोत्सवासाठी पथकांकडून वादन सरावास प्रारंभ

Published on

रमेश मोरे : सकाळ वृत्तसेवा
जुनी सांगवी, ता. १० ः जुनी सांगवी, नवी सांगवी परिसरात ढोल ताशांचा निनाद घुमू लागला आहे. गणेशोत्सवाच्या वादनासाठी परिसरातील ढोल ताशांच्या पथकाकडून वाद्यपूजन करून, ढोल- ताशा वादन सरावाची सुरवात करण्यात आली आहे.
जुनी सांगवी येथील सुवर्ण युग मित्र मंडळाच्यावतीने येथील गजानन महाराज मंदिरासमोरील मैदानावर वाद्यपूजन करून ढोल ताशा पथक वादनाची सुरवात करण्यात आली.
गणेश उत्सवासाठी महाविद्यालयीन तरुण तरुणींचा मोठ्या संख्येने वादन कलेत उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. गणेश उत्सव व ढोल ताशा वादनाची तरूणाईंमध्ये मोठी उत्सुकता असते. सांगवीतील मोठी मंडळे गणेशोत्सव व इतर सण उत्सवासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांत ढोल ताशा वादन करतात. अनेकजण नोकरी, शिक्षण सांभाळून ढोलताशा पथकात जुलैपासून सहभागी होतात. ढोल ताशा पथकांच्या उत्पन्नातून अनेक मंडळे मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवताना दिसतात. जुनी सांगवी येथील सुवर्णयुग मित्र मंडळाने विविध मराठी चित्रपटांसाठीही वादन केलेले आहे. जुनी सांगवीत या मंडळात वादन सहभागासाठी तरुणाईचा मोठा ओढा असल्याचे पहायला मिळते. पिंपळे गुरव येथील शिवादित्य ढोल ताशा पथकाचा वादन सराव सुरू झाला असून, येथील न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूलच्या मैदानावर पथकाकडून वादन सराव सुरू करण्यात आला आहे. समाज माध्यमांद्वारे ढोल ताशा पथकाकडून सहभाग व प्रवेशासाठी तरुणाईला आवाहन करण्यात येत आहे. पथकाकडून नवनवीन चाली तयार केल्या जातात. सुवर्णयुग मित्र मंडळाच्या पथकात दरवर्षी नवनवीन चाली व संबळ, ढोल, ताशा या वाद्यांचा सुरेख समावेश असल्याने या पथकाच्या वादनाची तरूणाईंस भुरळ पडते. दापोडीतील शिवशाही पथक, जुनी सांगवीतील आनंद नगर मित्र मंडळाचे गणेशा ढोल ताशा पथक, मल्हार ढोल ताशा पथक, शिवशक्ती मंडळाचे शिवशक्ती ढोल ताशा पथक, मधुबन येथील स्वराज्य पथक, अशी प्रमुख ढोल ताशा पथके आहेत. येथील पी.डब्ल्यू.डी.मैदान परिसरात आपापल्या सोयीनुसार विविध मंडळे दरवर्षी सराव वादन करतात.

‘‘‘सध्या गणेशोत्सवासाठी वाद्यपूजन करून वादन सराव सुरू करण्यात आला आहे. यावर्षीही पथकाच्या माध्यमातून वादनासोबतच सामाजिक उपक्रमावर भर देण्यात येणार आहे. पथकात सहभागी होण्यासाठी तरुणांची मोठी संख्या असते.
- सागर खोपडे, सुवर्णयुग युग प्रतिष्ठान गणेश मंडळ

‘‘ढोल ताशा पथकातील वादनामुळे व्यायाम होतो. या वादन कलेत एक वेगळा आनंद आहे. यातील उत्साहामुळे अनेक तरुणी पथकातून वादन करतात.
-आदिती शिंदे, शिवादित्य ढोल ताशा पथक
--------------------


फोटोः 15902, 15903

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.