‘सदाफुली’च्या ‘शालिनी’कडून मंगळागौरीचा बहर

‘सदाफुली’च्या ‘शालिनी’कडून मंगळागौरीचा बहर

रमेश मोरे : सकाळ वृत्तसेवा
जुनी सांगवी, ता. २४ ः सध्याच्या तरुण पिढीलाही हेवा वाटेल इतका उत्साह, स्वरचित गाण्यांना सुरमय चाली लावून जुनी सांगवीतील
शालिनी फाटक यांनी पुढील पिढीसाठी मंगळागौरचा वारसा जपला आहे. सदाफुली मंगळागौर मंडळ मधुबन सोसायटीच्या वतीने गेल्या दोन दशकांपासून त्याचे सादरीकरण सुरू आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी मंगळागौर कार्यक्रम होतात. सध्याच्या पिढीला मंगळागौर तसेच पारंपरिक खेळ, संस्कार व शास्त्रीय सोपस्काराचे धडे त्या देत आहेत.
श्रावण महिना विविध सण समारंभ व उत्सवांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. त्यातील मंगळागौर हा महिलांचा अत्यंत आवडता समारंभ. मात्र, आजच्या आधुनिक युगात त्यातील अनेक जुनी गाणी व खेळ लुप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळते. फाटक आजी सोसायटीतील महिलांना एकत्र करून त्यांना पारंपरिक गाण्यांचे धडे देत आहेत. हा खेळ टिकून राहावा विशेषतः त्यामध्ये अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, ही त्यांची त्यामागील भावना आहे. गेल्या दोन दशकांपासून त्या सणाच्या रूपातून मिळालेला हा वारसा जपत आहेत. त्यामध्ये त्यांनी स्वतः लिहिलेल्या गाण्यांचाही समावेश केला असून, त्याला चाल देऊन संगीताचा साज चढवीत ही गाणी ठेक्यात कशी सादर करायची याचे प्रशिक्षण त्या अन्य महिलांना देतात. सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली वीस महिलांचा ‘सदाफुली’ हा एक गट कार्यक्रम करीत आहेत.
समाजातील घराघरांतील कुटुंबातील अंतर्मुख करणारी गाणी, सासू सुनेचे भांडण, नवरा-बायकोमधील वा त्यातून निर्माण झालेला दुरावा, प्रेम, विनोद या विषयांवर फाटक आजींनी रचलेली गाणी अंतर्मुख करतात. पारंपरिक गाण्याबरोबरच सध्याच्या टीव्ही मालिकांचा सिनेमांचा असलेला प्रभाव त्या गीतातून आवर्जून त्या मांडतात. ‘माझ्या अंगणी नाच नाचते नवऱ्याची बायको, माझा मोबाईल काय केला, भावाच्या लग्नात वहिनीला दिला. ‘तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला, फोडणीच्या पोह्यांसाठी लागली तहान, भारत माझा देश महान अशी साज चढविलेली त्यांची गाणी उपस्थितांना विचार करायला लावतात. या माध्यमातून फुगडी, बस फुगडी, भिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, झिम्मा अशा लुप्त होत चाललेले महिलांचे खेळ व त्यातून होणाऱ्या आरोग्यदायी व्यायामाचे महत्त्व त्या पटवून सांगतात.

‘‘प्रत्येक भारतीय सण उत्सवामागे एक कारण दडलेले आहे. मंगळागौरमधून विविध गुण कला जोपासल्या जातात. यातून आरोग्यदायी व्यायामाची भर पडते. आजच्या पिढीने हे अवगत केले पाहिजे.’’
- शालिनी फाटक, जुनी सांगवी

शालिनी फाटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com